पुणे : पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हटलं जातं. याच पुण्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिकेने देशभरात नावलौकिक मिळवला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून (Education Ministry) राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची (National Awards to Teachers) घोषणा करण्यात आली आहे. त्यात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षिका मृणाल नंदकिशोर गांजाळे (Mrunal Ganjale) यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. देशातील 50 शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे त्यात मृणाल या महाराष्ट्रातून एकमेव शिक्षिका आहेत.
महाराष्ट्रातून एकमेव असलेल्या शिक्षिका मृणाल या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव महाळुंगे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिका आहेत. शाळेत विविध उपक्रम त्या राबवत असतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासावर त्या भर देत असतात. त्या तसेच 2023-24 च्या शरद पवार इंस्पायर फेलोशिप इन एज्युकेशनच्या फेलोच्या मानकरीही ठरल्या आहेत.
राज्याच्या शिक्षण आयुक्तांकडून अभिनंदन...
राज्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी मृणाल गांजाळे यांचे अभिनंदन केले आहे. गांजाळे यांची सर्वाधिक गुणांनी निवड राज्यस्तरीय निवड समितीने केली होती आणि राष्ट्रीय पुरस्कारासाठी शिफारस केली होती. त्याबद्दल राज्यस्तरीय निवड समितीचे अध्यक्ष आणि शिक्षण आयुक्त म्हणून मी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत असल्याचं मांढरे यांनी सांगितलं आहे.
पुरस्काराची स्वरुप काय?
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून दरवर्षी शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात येतो. राष्ट्रीय शिक्षक दिनी या पुरस्कांचे वितरण केले जाते. यंदा मंत्रालयाकडून 50 शिक्षकांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला असून येत्या 5 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवनमध्ये पुरस्कारांचे वितरण होणार आहे. प्रत्येकी 50 हजार रुपये रोख, प्रमाणपत्र आणि पदक असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा कार्यक्रम दूरदर्शन आणि शिक्षण मंत्रालयाच्या स्वयं प्रभा वाहिनीवरून थेट प्रसारित केला जाईल आणि https://webcast.gov.in/moe. वर थेट प्रसारित केला जाईल.
मागील वर्षी राज्यातील तीन शिक्षकांना पुरस्कार
मागील वर्षी देशातील 46 शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यात राज्यातील तीन शिक्षकांचा समावेश होता. राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालेल्या राज्यातील शिक्षकांमध्ये बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दामुनाईकतांडा गेवराईचे शिक्षक शशिकांत संभाजीराव कुलथे आणि जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पारगाव जोगेश्वरीचे शिक्षक सोमनाथ वामन वाळके तसेच मुंबईतल्या चतुर्भुज नरसी मेमोरियल स्कूलच्या प्राचार्य कविता संघवी यांचा समावेश होता.