परभणी : 'परभणीमध्ये विकासाची गंगा आणणार', असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या माध्यमातून परभणीकरांना आश्वासन दिलं आहे. 'आम्ही हा कार्यक्रम पाटणपासून सुरु केला पण काही लोक पाटण्यात जमले आणि द्वेषाची खिचडी शिजवू लागले', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. परभणीमध्ये 'शासन आपल्या दारी' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित होते. 


आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ - मुख्यमंत्री


शासन आपल्या दारी आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आतापर्यंत दीड कोटी लाभार्थ्यांना लाभ मिळाला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हे काम होत असून त्यामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला लाभ मिळत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावर बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, 'आतापर्यंत 22,000 ट्रॅक्टर्सचं वाटप करण्यात आलं आहे. तर 22,500 रोटर व्हेटर शेतकऱ्यांना वाटले आणि चार लाख लाभार्थ्यांना 1351 कोटी रुपयांचं वाटप आतापर्यंत करण्यात आलं आहे.' 


महिलांसाठी विशेष योजना


'महिलांसाठी केवळ बचतगटच नाही तर शक्तिगट आपल्याला तयार आहे. महिलांसाठी अनेक विशेष योजनांचं आयोजन करण्यात आलं आहे. महिलांना त्यांचं कुटुंब सांभाळताना स्वत:च्या पायावर उभं करण्याची जबाबदारी शासनाने घेतली आहे. महिला बचत गटाची योजना देखील अधिक मजबूत करण्याचं काम शासन आता करणार आहे', असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. 


मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा


मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे यांच्यावर देखील टीकास्र सोडलं. "काही लोक घरात बसून राज्याचा कारभार ऑनलाईन बसून करत होते. परंतु आम्ही त्यांना एक झटका दिला आणि ऑनलाईनवरुन त्यांना थेट लाईनवर आणलं आहे," असं मुख्यमंत्री म्हणाले आहे. "तुमचा भोंगा हा कायम शिव्या शाप देण्यासाठी वाजतो पण आमचा भोंगा हा शासन आपल्या दारीच्या माध्यमातून लोकांसाठी वाजतो," असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. 


'काही लोक राजकारणामध्ये गोंधळ निर्माण करत आहेत'


'सरकार पडणार, मुख्यमंत्री बदणार अशा खोट्या बातम्या सतत पसरवल्या जातात. पण या बातम्या पसरवता पसरवता अजित पवारच सरकारमध्ये आले आणि सरकार आणखी मजबूत झालं. सध्या या लोकांकडून राजकारणात गोंधळ निर्माण केल्याचं काम केलं जात आहे. पण हे सर्वसामान्यांचं सरकार आहे', असं म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. 


सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याची आमची भूमिका आहे, त्याचसाठी आम्ही अनेक योजना आणत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी हे सरकार खंबीरपणे उभं आहे असं आश्वासन दिलं. 


हेही वाचा : 


Parbhani Shasan Aplya Dari : मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही; फडणवीसांनी सांगितला दुष्काळमुक्त मराठवाड्याचा 'प्लॅन'