Pune FTII Hunger Strike : FTII विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस, एका विद्यार्थ्याची प्रकृती बिघडली
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील तीन विद्यार्थी रविवारपासून बेमुदत उपोषणावर आहेत. आज उपोषणाला 5 दिवस पूर्ण झाले आहेत.
Pune FTII Hunger Strike : पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) मधील तीन विद्यार्थी रविवारपासून बेमुदत उपोषणावर आहेत. आज उपोषणाला 5 दिवस पूर्ण झाले आहेत. संस्थेने एका विद्यार्थ्याला बॅचमधून काढून टाकल्याचा आरोप या विद्यार्थांनी केला आहे. उपोषणाला बसलेल्या तीन मुलांपैकी एकाची प्रकृती खालावल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी दोन मुले उपोषणावर आहेत. अश्विन या विद्यार्थ्याची प्रकृती खालावली असून त्याला पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो या संस्थेत एडिटिंगच्या दुसऱ्या वर्षातील विद्यार्थी आहे.
विद्यार्थी उपोषण का करत आहेत?
2020 च्या बॅचमधून एका विद्यार्थ्याला 'ड्रॉप' करून भेदभावपूर्ण वागणूक देण्यात येत असून पुढील बॅचमध्ये प्रवेश देण्याच्या शैक्षणिक परिषदेने नुकत्याच घेतलेल्या निर्णयाविरोधात विद्यार्थी निषेध करत आहे. आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांना बजावलेल्या शिस्तभंगाच्या नोटीसांवर देखील तोडगा निघावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. एफटीआयआय विद्यार्थी संघटनेने सांगितले की, संस्थेच्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्याने गेल्या पाच दिवसांत आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली नाही. विद्यार्थी संघटनेच्या सदस्यांनी असेही सांगितले की, प्रशासनाकडून समस्या सोडवण्यासाठी किंवा एकमत होण्यासाठी अद्याप कोणतीही पावले उचलली गेली नाहीत.
''ड्रॉप' विद्यार्थी मानसिक तणावात होता तरीही...'
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून वर्ग थांबवले आहेत. 5 विद्यार्थ्यांना 75% हजेरी नसल्याने आणि हवे तितके क्रेडिट नसल्याने परीक्षा देता येणार नाही असे सांगितले. नंतर शैक्षणिक परिषदेने 4 विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यास परवानगी दिली मात्र एकाला पुढील वर्षी परीक्षा देण्यास सांगितले. त्यानंतर 2020 बॅचमधील सर्वच विद्यार्थ्यांनी वर्गात जाणे बंद केले आहे. 15 मे पासून 3 विद्यार्थी उपोषणाला बसले असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. यातील एका विद्यार्थ्याला आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आणखी दोन विद्यार्थी आज उपोषणाला बसले आहे. इतकं होऊनही कॉलेज प्रशासनाकडून कुणीही विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्यायला आलेलं नसल्याचं विद्यार्थी सांगतात. 'ड्रॉप' विद्यार्थी गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावात होता. पण प्रशासन मात्र त्याच्याकडे दुर्लक्ष करत होतं. विनंती करुनही प्रशासन त्याच्या समस्येकडे लक्ष देत नव्हतं, असंही विद्यार्थी सांगतात.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही संस्था अभिनयाचे प्रशिक्षण देण्यासाठी लोकप्रिय आहे. मात्र, इथे सिनेमाचा अविभाज्य भाग असणाऱ्या दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, एडिटिंग, स्क्रिप्ट रायटिंग अशा बाबींचेही प्रशिक्षण दिले जाते. शिवाय साउंड रेकॉर्डिंग, कलादिग्दर्शन, अॅनिमेशन आणि ग्राफिक्स यांचेही अभ्यासक्रम येथे शिकविले जातात. याशिवाय संस्थेमार्फत अनेक छोटे अभ्यासक्रमही चालवले जातात.
संबंधित बातमी-