Pune Manchar dog Bite : पुणे जिल्ह्यात कुत्र्यांचा (dog) धुमाकूळ सातत्याने वाढत आहे. कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्येही वाढ झाली आहे. कुत्र्यांचा उच्छाद संपायचं नाव घेत नाही आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरमधील (Manchar) 17 जणांवर जीवघेणा हल्ला केला आहे. त्यात 10 लहान मुले, 5 पुरुष आणि 2 महिलांचा सामवेश आहे. यातील पाच जणांचे कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात लचके तोडले आहेत. यातील काही जणांवर औंध रुग्णालय उपचार सुरु आहेत. तर काहींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


अंशुमन किरण गुंजाळ या 10 वर्षीय मुलाच्या दोन्ही गालांवर मोठ्या जखमा झाल्या आहेत तर फजल अब्बास मीर या 5 वर्षीय मुलाच्या मानेला मोठी जखम, या सगळ्याच जखमींना गंभीर इजा झाली आहे. गावातील पिसाळलेल्या कुत्र्याने हल्ला केला आहे. या कुत्र्याचा शोध घेतला असता कुत्रा सापडला आणि शुक्रवारी (15 एप्रिल) संध्याकाळी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार करण्यात मंचर नगरपंचायतीला यश आले आहे. आरुष अक्षय मनकर, मिजल हक, शहाअली इमाजअली मीर, कृष्णा समाधान गांगुर्डे, रिजवान मुश्ताक शेख, मंजर सईद शेख, सुनील नथू धीमते, संजय पांडुरंग पडघणे, विलास भगवान बोऱ्हाडे, अनुसया अंकुश बढे यांच्यावर आणि इतर काही जणांवर कुत्र्याने हल्ला केला आहे. या सगळ्यांवर उपचार सुरु आहेत.


बघ्याची भूमिका घेतल्याने हल्ले वाढले..


मागील काही दिवसांपासून मंचर शहरात कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पिसाळलेल्या एका कुत्र्याने काही जणांवर हल्ला केला होता. त्यानंतर हल्ले वाढतच गेले. मात्र या सगळ्यात नगरपंचायतीने बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे हल्ल्यांमध्ये अजून वाढ झाली. वेळेतच कुत्र्याचा योग्य बंदोबस्त केला असता तर हल्ल्यांपासून बचाव झाला असता. मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने लहानांवरील हल्ले वाढले, असं नागरिकांचं म्हणणं आहे. 


कोल्हापूरमध्येही हल्ले


कोल्हापूर शहरातदेखील भटक्या कुत्र्यांनी हल्ले केले होते. गांधीनगरमध्ये वारंवार होणाऱ्या भटक्या कुत्र्यांचे हल्ले स्थानिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. या हल्ल्यामध्ये चार महिला, तीन मुले आणि सात पुरुष असे एकूण 14 जण जखमी झाले होते. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त केला होता. गांधीनगर परिसरात भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी मागणी वारंवार करुनही ग्रामपंचायत करते तरी काय? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला होता. 


संबंधित बातमी-
धक्कादायक! कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी चिमुकल्याचा मृत्यू; 22 दिवसांची झुंज अपयशी