मुंबई:  राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सुरुच आहे.  राज्यात काल सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांनी एक हजारांचा आकडा ओलांडला आहे. तर रुग्णसंख्या वाढत गेली तशी हळूहळू मृतांची संख्याही वाढत  आहे. मागील 11 दिवसाची आकडेवारी पाहता राज्यात  कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू  झाल आहे.   मृतांमध्ये बहुतांश सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समवेश आहे.   त्यामुळे जोखमीच्या गटातील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

2 ते 14 एप्रिल या काळात मृतांची संख्या 30 वर गेली आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्यावर 60 वर्षांवरील नागरिक, प्रतिकारशक्ती कमी असलेले रुग्ण यांमध्ये बाधितांचे प्रमाण वाढते आणि मृतांची संख्या वाढायला सुरुवात होते. मागील तीन  लाटेमध्येही जवळपास असेच चित्र दिसले होते. परंतु बाधितांच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी असल्याने चिंतेचे कारण नाही. परंतु गर्दीच्या ठिकाणी मास्त वापरणे गरजेचे आहे.

तारीख रुग्णसंख्या मृत्यू
14 एप्रिल  1152  04
13 एप्रिल  1086 01
12 एप्रिल 1115 09
11 एप्रिल 919 01
10 एप्रिल 328 01
09 एप्रिल 788 01
08 एप्रिल 542 01
07 एप्रिल 926  03
06 एप्रिल 803 03
05 एप्रिल 569 02
04 एप्रिस 711 04

राज्यात  काल दिवसभरात तब्बल 1 हजार 152 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर चार  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनही अलर्ट मोडवर असून पालिका रुग्णालय, कार्यालयं याठिकाणी प्रशासनाने मास्कसक्तीचे आदेश जारी केले आहेत. 

मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य

कोरोना पुन्हा एकदा  डोकं वर काढू पाहतंय, त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने (BMC) तयारी सुरू केली आहे.  मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Hospitals) सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती (Mask Compulsory) करण्यात आली आहे.

कोरोनाशी लढण्यासाठी मॉकड्रील 

 देशभरासह राज्यात कोरोनाने (Corona) पुन्हा डोकंवर काढलं आहे. या पार्श्वभूमीवर  केंद्रीय आरोग्य मंत्रालयही खडबडून जागं झालं आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय (Mansukh Mandaviya) यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांचे आरोग्यमंत्री उपस्थित होते. या बैठकीत कोरोनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संपूर्ण देशभरात मॉकड्रिल घेण्यात  आले . 

गरज असेल तिथे मास्क वापरा... 

सद्यस्थितीत आढळून येत असलेला व्हेरिएंट्स फारसा घातक नसून यात रुग्ण घरी उपचार घेऊन देखील बरा होत आहे. पेशंटला व्हेंटिलेटर किंवा आयसीयू बेडची गरज पडत नाही. परंतु पेशंटला मात्र काही प्रमाणात त्रास होतो आणि म्हणून पेशंट असेल किंवा सीनियर सिटीजन असतील, यांना देखील विशेष काळजी घेण्याचा आवाहन सरकारने केलेले आहे. गरज असेल तिथे मास्कचा वापर करा, विशेष करून गर्दीच्या ठिकाणी, हॉस्पिटलमध्ये, जिथे इन्फेक्शनचा धोका असतो, तिथे मास्क जर लावला पाहिजे असे देखील सूचना भारती पवार यांनी दिल्या.