मुंबई : भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल... भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर हँडलवरुन पोस्ट झालेल्या या ट्विटमुळे, भाजपमध्येच अस्वस्थता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी, भाजपचा असा कोणताही अजेंडा नसताना, असं ट्विट कुणी आणि का केलं? हे समोर येईलच, असं वक्तव्य केलं आहे त्यामुळे भाजपच्या सोशल मीडिया सेलमधून अशी पोस्ट चुकून केली? की जाणूनबूजून केली गेली? असे प्रश्न समोर आले आहेत.
कालच या पोस्टवरुन एबीपी माझानं, हिंदुराष्ट्र... ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का? असा प्रश्न विचारला होता... तेव्हा भाजपच्या काही नेत्यांनी हिंदुराष्ट्र हीच आपली भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली होती. पण आज प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी हिंदुराष्ट्र म्हणजे बहुसंख्य हिंदूंचा देश, अशी त्याची व्याख्या केली. तर दुसरीकडे सुधीर मुनगंटीवर यांनी तर हिंदुराष्ट्राचा अजेंडा, भाजपचा नाही, असं म्हणत, या ट्विटच्या चौकशीचे संकेत दिले.
विरोधकांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांकडून सार्वजनिक मंचावरून हिंदू राष्ट्राच्या मागणीची अनेक वक्तव्य समोर आली आहेत. आता महाराष्ट्रातही हिंदू राष्ट्राचा मुद्दा समोर आला आहे. भाजपाच्या या ट्विटनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. नाना पटोले म्हणासे, देशाच्या संविधानाला जे लोक मानत नाहीत. त्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा केली भारताचं संविधान आहे. संविधान आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहे. संविधान नसतं तर ते उपमुख्यमंत्री झाले नसते.
ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, भारत हे हिंदुराष्ट्र असेल आणि ते हिंदुराष्ट्रच मानायचे असेल तर या राज्यातील सर्व धर्माचे लोकं वाऱ्यावर सोडून द्यायचे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण जर असंच असेल तर त्यांनी त्यांच्या पक्षाचे नाव भारतीय जनता पार्टी न ठेवता ते बदलून ते हिंदुस्तान जनता पार्टी करावे.
इतर महत्त्वाच्या बातम्या :
चंद्रकांत पाटलांना 'ते' वक्तव्य टाळता आलं असतं, अमित शाह यांच्या भेटीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया