Pune MPSC Girl Dead Body Crime : राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी संशयास्पद अवस्थेत मृतदेह सापडलेल्या दर्शना पवार या तरुणीची हत्या झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये हे निष्पन्न झालं आहे. या सगळ्या प्रकरणी पोलिसांचा तिच्या सोबत राजगडावर ट्रेकला गेलेल्या मित्रावर संशय आहे. राहुल हांडोरे असं तिच्या मित्राचं नाव आहे. राहुल 12 जूनपासून पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी पाच पथकं तयार केली आहे आणि अज्ञात आरोपीविरोधात हत्येचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे.
राहुल हांडोरेवर पोलिसांना का संशय?
12 जूनला राहुल आणि दर्शना राजगडावर ट्रेकिंगला गेले होते. त्यानंतर 18 जूनला तिचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. तिच्या वडिलांनी या मृतहेदाची ओळख पटवली आणि त्यानंतर पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलीस दोघांच्या कुटुंबियांची माहिती घेत आहेत. त्यादरम्यान पोलीसांना राजगडाजवळील एका हॉटेलचे सीसीटीव्ही चेक केले. या सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती समोर आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सकाळी 6 वाजून 10 मिनिटांनी राजगडाच्या पायथ्याशी दोघेही राजगड चढायला जाताना दिसत आहे. मात्र सकाळी 10 वाजताच्या सुमारास राहुल एकटाच परत येताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांचा संपूर्ण संशय आता राहुल हांडोरे म्हणजेच तिच्या मित्रावर आहे.
कोण आहे राहुल हांडोरे?
राहुल हांडोरे हा मुळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर लातुक्यातील शाहवाडी गावाचा आहे. त्याने BSCचं शिक्षण घेतलं होतं. त्यानंतर तो पुण्यात MPSC ची तयारी करत होता. दोघांची ओळख पुण्यातच झाली होती. मागील काही महिन्यांपासून दोघेही एकमेकांच्या चांगल्या संपर्कात होते. याच ओळखीतून दोघेही ट्रेकिंगला गेले असता ही घटना घडली. 9 तारखेला हे दोघं ट्रेकिंगला गेले होते. मात्र दोन ते तीन दिवस दोघांचा पत्ता न लागल्याने अखेल राहुलच्या कुटुंबियांनी 12 जूनला पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.
राहुल हांडोरे पसार... कुटुंबियांना केला होता फोन...!
12 जूननंतर राहुल हांडोरे पसार आहे. पोलीस त्याचा शोध घेतल आहे मात्र दुसऱ्याच्या फोनवरुन घरी फोन करुन त्याने या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याची माहिती दिली आहे. त्याला शोधण्यासाठी आणि या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी पाच पथकं नेमली आहे. राहुल हांडोरेचा फोन बंद आहे. दुसऱ्या राज्यात त्याचं लोकेशन आढळलं आहे. त्याने फोन सुरु केल्यावर तो कोणत्या भागात आहे, हे स्पष्ट होईल, असं पोलिसांनी सांगितलं आहे.
दोघांच्या कुटुंबियांकडून तक्रार दाखल
दर्शनाने घरी आणि मैत्रीणीला राजगडावर ट्रेकिंगला जात असल्याची माहिती दिली होती. मात्र काही तासांनी घरच्यांनी तिच्याशी संपर्क साधला असता तिचा फोन बंद लागला. त्यानंतर घरच्यांनी तिच्या फोनची वाट बघितली. मात्र अनेकतास उलटून गेल्यावरही तिचा फोन न लागल्यामुळे सिंहगड पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. सोबतच राहुलचा फोन लागत नव्हता त्यामुळे त्यांच्याही कुटुंबियांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
संबंधित बातमी-
Pune Crime News : दर्शना पवारचा खुनच, तपासासाठी पुणे ग्रामीण पोलिसांची पाच पथके रवाना