Ganesh Sugar Factory : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात भाजपच्या युवा नेत्याने काँग्रेसच्या मदतीने भाजपच्याच ज्येष्ठ नेत्याचा पराभव केला आहे. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं होमग्राऊंड असणाऱ्या  राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Ganesh Sugar Factory Election) थोरात-कोल्हे अशा युतीनं विजय मिळवला आहे. 19 पैकी 18 जागा जिंकत बाळासाहेब थोरात आणि विवेक कोल्हे यांनी निवडणूक जिंकली आहे. 


सत्ताधारी विखे गटाला केवळ एक जागा


1957 साली स्थापन झालेल्या राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यावेळी प्रथमच राज्यभर गाजली ती विविध कारणांनी. कारण इथं भाजप विरुद्ध भाजप + काँग्रेस अशी अनोखी युती पाहायला मिळाली. त्यामुळं या निवडणुकीकडं राज्याचं लक्ष लागलं होतं. 19 जागांसाठी 89 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत कोल्हे आणि थोरात युतीने 19 पैकी 18 जिंकत विखे गटाला मोठा धक्का दिलाय. मागील आठ वर्षांपासून सत्ता असलेल्या विखे गटाला मात्र यावेळी अवघ्या 1 जागेवर समाधान मानण्याची नामुष्की आली आहे. 


विजयी सभेत विखेंवर टीकास्त्र


राहाता तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीनंतर शहरातून भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. विखेंच्या मतदारसंघात निघालेल्या मिरवणुकीत कार्यकर्तेसुद्धा मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. यानंतर बाजार तळावर दहशतीचे झाकण उडवले या बॅनरखाली झालेल्या विजयी सभेत विखेंवर टीकास्त्र सोडण्यात आले. विशेष म्हणजे नगर दक्षिणेतील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी या सभेला उपस्थिती लाऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 


बाळासाहेब थोरात भाषण मुद्दे


मी कायम विजय पाहिला आहे. मात्र, अशा उत्साहाची सभा मी पाहिली नसल्याचे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले. एक दिवस असा होता सांगता सभेला परवानगी नाही. पण आज इथेच विजयो सभा घेतोय. प्रसाशन कोणाच्या दबावाखाली नसतं हे लक्ष्यात ठेवा. आज ही परवानगी आम्ही इथे आल्यावर दिली. दहशतीवर राजकरण करण्याची पद्धत या भागात आहे. मात्र, आज हें झाकण उडविण्याची सभा असल्याचे थोरात म्हणाले. राहाता बाजार समितो निवडणुकीत अनेकांना आम्ही रस्त्यावर उभं केलं. विवेक भैया तयार झाला आणि मूठ बांधली. तुम्ही आज उज्वल भविष्यासाठी मतदान केल असल्याचे थोरात म्हणाले. 


सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जागा दाखवली : निलेश लंके  


परिवर्तनाची सुरुवात राहात्यातून झाली आहे याचा शेवट नगर दक्षिणमध्ये होणार असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. बाळासाहेब थोरातांनी अनेक वर्षे महसूलमंत्री पद सांभाळले पण कधी सत्तेचा गैरवापर केला नसल्याचे लंके म्हणाले. सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना जागा दाखवली, तुम्हाला सलाम, संयमी नेतृत्व असलेल्या बाळासाहेब थोरातांना फुल एनर्जी असणाऱ्या विवेक कोल्हेंची साथ मिळाली.  तुम्ही उडवलेल्या गुलालाने त्यांची झोप उडवली आणि सत्तेची धुंदी उतरवल्याचे लंके म्हणाले. जनतेने ठरवले तर काहीही होऊ शकते. मी कमी बोलतो पण काम दाखवतो. गणेश कारखाना वाचवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांचे लोक एकत्र आले होते असेही निलेश लंके म्हणाले. 


जितकं जास्त डिवचले तेवढी माझी एनर्जी वाढली : विवेक कोल्हे 


विचारांची लढाई विचाराने लढली पाहिजे. थोडं प्रेमानं बोलले असते तर हे झालं नसतं असे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे म्हणाले. थोरात साहेबांनी प्रेमाने मानस जिंकली. त्यामुळं त्यांच्याबरोबर गेलो. जितकं जास्त डिवचले तेवढी माझी एनर्जी वाढल्याचे कोल्हे म्हणाले. सहकारी संस्थेत विधानसभेची धमकी कशाला. तुमच्यावाचून आमचंही अडल नाही. जित के भी अहंकार न रखनेवाले को बाजीगर कहते है असं कोल्हे म्हणाले. आमच्या आमदारकीसाठी 12 -12 तास उभे राहणारे उमेदवार दिले नाही. आमदारकीपेक्षा लोकांच्या मनात जागा मिळवली हे माझ्यासाठी मोठं असल्याचे कोल्हे म्हणाले. विखे पाटील यांचा प्रचंड आदर आहे. मात्र, त्यांनी जो उल्लेख केला तो आवडला नाही असे कोल्हे म्हणाले.