Pune Koyta Gang : पुण्यात मंगळवारी लागोपाठ दुसऱ्या दिवशी गाड्यांची तोडफोड करण्याचा धक्कादायक प्रकार आढळून आला आहे. सोमवारी (19 जून) भल्या पहाटे वारजे परिसरात पाच वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या होत्या. पुण्यातील तळजाई परिसरात मंगळवारी (20जून) पहाटे 30 गाड्या फोडण्यात आल्या आहेत. ही घटना वनशिव झोपडपट्टी परिसरात घडली. या घटनेत सहा जणांनी तोंडावर रुमाल बांधून धुडगूस घातल्याचं आढळून आलं आहे. सहकार नगर पोलिसांकडून या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे. 


पुण्यातील कर्वेनगर भागातही सोमवारी रात्री चार टेम्पो आणि चार चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली. तोडफोड करणाऱ्या तरुणांनी त्याआधी एका तरुणावर कोयत्यानं वारही केले. पुण्यातल्या कर्वेनगर परिसारात तोडफोड करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पण या घटनांनी शहरात दहशतीचं वातावरण निर्माण केलं आहे


पोलिसांकडून कोयता गँगची धिंड


कर्वेनगरमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपीची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली. कर्वेनगर आणि वारजे परिसरात मागील दोन दिवसात तीन ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या या भागातील वाघमारे आणि त्याच्या टोळीने या वाहनांची तोडफोड केली. या टोळीचे तीन हत्ती चौकात आधी विरोधी टोळीसोबत भांडण झाले. त्यानंतर वाघमारे आणि त्याची टोळी पोरांनी सहकारनगर भागात गेली आणि तिथे या टोळीने आणखी वाहनांची तोडफोड केली. कालच्या रात्रीत या टोळीने कर्वेनगर आणि सहकारनगर भागात धुमाकुळ घातला होता. सकाळी पोलिसांनी वाघमारेला पकडलं आणि त्याची धिंड काढली.


काल वारजे परिसरात फोडल्या गाड्या


मागील काही दिवसांपासून पुण्यात या टोळीने धुमाकूळ घातला आहे. रोज नव्या घटना समोर येत आहेत. कालच वारजे रामनगर कॅनाॅल रस्त्यावर नागेश्वर महादेव मंदिर येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एकूण सात वाहनांवर लोखंडी कोयत्याने वार करुन काचा फोडून वाहनांचे नुकसान केल्याची घटना वारजेतील रामनगर कॅनाॅल रस्त्यावर सोमवारी (दि. 19 जून) रोजी पहाटे चारच्या सुमारास घडली होती. काळ्या रंगाच्या अॅक्टिव्हा या दुचाकीवरुन गेलेल्या अज्ञात तीन व्यक्तींनी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता नागरिकांनी वर्तवली आहे. याबाबत स्थानिक गाडी मालकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळवले आहे. 


सुप्रिया सुळेंकडून कारवाईची मागणी


खासदार सुप्रिया सुळेंनी ट्वीट करुन कोयता गँगवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, पुण्यामध्ये पुन्हा एकदा कोयता गँग कमालीची सक्रिय झाली आहे. या टोळीतील गुन्हेगार दिवसा देखील तोडफोड करतात. नागरिकांना धमकावून त्यांना मारहाण करतात. वारजे, पुणे येथेही या गँगने धुमाकूळ घालत गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेबाबत पुण्याच्या पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा केली. माझी राज्याच्या गृहमंत्र्यांना विनंती आहे की, गेल्या काही दिवसांत पुणे आणि परिसरात वाढलेल्या गुन्हेगारीवर आळा घालणे अतिशय गरजेचे झाले आहे. पुण्यातील संघटित गुन्हेगारीवर कायमचा आळा घालण्यासाठी राज्याच्या गृहमंत्र्यांनी पुढाकार घेऊन उचित कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत.