Uddhav Thackeray Live Press Conference : शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गट (Shiv Sena : Uddhav Balasaheb Thackeray) येत्या 1 जुलैला मुंबई महापालिकेवर (Mumbai Municipal Corporation) विराट मोर्चा काढणार आहे. या मोर्चाचं नेतृत्व शिवसेना नेत्यांसह आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) करतील अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केली. मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, मुंबई मनपाच्या ठेवी म्हणजेच जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरु आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येईल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरे काय म्हणाले? 


"काल शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा झाला. त्याआधी शिबीर झालं. आज बऱ्याच दिवसानंतर नगरसेवकांची बैठक घेतली.  पावसप्रमाणे निवडणुका सुद्धा लांबणीवर जातायत. लोकांची काम करायची कशी ? असा प्रश्न पडतोय. मुंबईकरांचा पैसा उधळला जातोय, वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला मायबाप कोणी राहिला नाही.  या भ्रष्टाचाराविरोधात मुंबई महापालिकेवर 1 जुलैला आम्ही मोर्चा काढू. आदित्य ठाकरे या मोर्च्याचं नेतृत्व करतील.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 


उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले की, "एसआयटी चौकशी म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा. कुठेही भ्रष्टाचार आमच्या काळात झाला नाही." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आज जागतिक गद्दार दिनाची मागणी केलीये, त्यामुळे तो दिन साजरा केला जाणार. त्यांना एसआयटी स्थापन करून कोंडी करायचं तर करू देत. भ्रष्टाचार कोण करतंय? हे आम्ही समोर आणतोय. अनेक प्रकल्पात कसा भ्रष्टाचार होतोय? रस्ते घोटाळा खडी घोटाळा तो समोर आणलाय. मिंधे दिल्लीत सातत्याने का जातयेत? त्यांना नोटीस येत असतील. ज्यांना यायचं त्यांनी मोर्च्यात येऊ दे. 92 हजार कोटींची ठेवी हे सगळे लोक लुटताय. महाविकास आघाडीला जर मोर्च्यात सोबत येत असतील तर येऊ देत, गद्दारांकडे स्वतः ची ताकद नाहीये.", असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर निशाणाही साधला आहे. 


तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख अर्धवटराव असा केला होता. याला प्रत्युत्तर देताना, मी अर्धवटराव, तर ते काय आवडाबाई आहेत का? असं म्हणत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना टोला लगावला आहे. 


माजी नगरसेवकांच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद


दरम्यान, मुंबईत आज ठाकरे गटातील (Thackeray)मुंबईतील माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. मुंबईतील शिवसेना भवन इथे ही बैठक पार पडली. या बैठकीत ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे माजी नगरसेवकांना मार्गदर्शन केलं. आगामी मुंबई महापालिकेच्या दृष्टीनं आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे.