पुणे : पुण्यात शाळकरी मुलींवर(crime news) अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यातच शाळेतील शिक्षकच हैवान ठरल्याचं समोर आलं आहे. येथील केंद्रीय विद्यालयातील नराधम शिक्षकाने शाळेतील दोन विद्यार्थिनी सोबत अश्लील चाळे करत विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. पीटीचा क्लास घेत असताना शिक्षकाने विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे विश्वास नेमका कुणावर ठेवावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या शिक्षकावर सर्व स्तरावरुन संताप व्यक्त केला जात आहे. 


याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने विमानतळ पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून विनयभंग करणाऱ्या शिक्षकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय देशमुख असं शिक्षकाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे असलेल्या केंद्रीय विद्यालयात आरोपी शिक्षक हा या शाळेत शारीरिक शिक्षणाचा (पीटी) शिक्षक आहे. तक्रारदार महिलेची दहा वर्षाची मुलगी शाळेत असताना दोन आठवड्यांपूर्वी आरोपी शिक्षकाने पीटी क्लास घेत असताना मैदानावर वाईट उद्देशाने तिच्या अंगाला घाणेरडा स्पर्श केला. तर दुसऱ्या विद्यार्थिनीला  तुला पीटी क्लास कसा वाटला असे विचारत तिच्याशी आश्लील कृत्य केले. या प्रकारानंतर मुलींनी घरी गेल्यानंतर त्यांच्या आईला हा घडलेला प्रकार सांगितला. कुटुंबीयांनी थेट पोलिसात तक्रार दाखल केली.


शाळकरी शिक्षकच बनले भक्षक..


काही दिवसांपूर्वी  शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील क्रीडा शिक्षकाने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. महानगरपालिकेच्या शाळेत ही संतापजनक घटना घडली होती. या प्रकरणी 23 वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली होती. अविनाश गोविंद चिलवेरी असं या शिक्षकाचं नाव होतं. 'गुड टच बॅड टच' हा उपक्रम एका स्वयंसेवी संघटनेने राबवला होता. यातून हा प्रकार समोर आला. 


'गुड टच बॅड टच' कार्यक्रम गरजेचा


सध्या पुण्यात अनेक शाळांमध्ये शाळकरी मुलींसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या समुपदेशनाचा वर्ग घेतला जातो. त्यात अनेक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. सायकोलॉजिस्ट किंवा इतर डॉक्टर प्रत्येक शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादातून विद्यार्थिनींना अनेक प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं. लैंगिकतेबाबत माहिती दिली जाते. त्यासोबतच गुड टच बॅड टच याची देखील उत्तम प्रकारे माहिती दिली जाते. यामुळे विद्यार्थिनींना लैंगिक छळाबाबत माहिती मिळते.