पुणे : राज्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस पडला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत आहे. लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी पुन्हा एकदा ट्वीट करत केली आहे. राज्यात दरवर्षीच्या तुलनेत यंदा कमी पाऊस पडला आहे. राज्यातील धरणातील पाणीसाठा पुरेसा नाही आहे. त्यामुळे त्यांनी ही मागणी केली आहे.
ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे. त्यात त्या लिहितात की, "गेल्या काही वर्षांत प्रथमच संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला. याचा शेती व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. धरणातील पाणीसाठा अतिशय जपून वापरण्याची गरज आहे. काही धरणांनी तर तळ गाठला आहे. ही सगळी परिस्थिती दुष्काळाकडे इशारा करत आहे. हळूहळू ही परिस्थिती आणखी भीषण होईल, असे दिसते. हे लक्षात घेता शासनाने दुष्काळ जाहीर करण्याबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांना चारा छावण्यांच्या माध्यमातून पुरवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांची शासनाने तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे."
सुप्रिया सुळेंनी ट्वीट केलेले मुद्दे-
1. ऑगस्टमध्ये, आपल्या राज्यात नेहमीच्या केवळ 40% पाऊस पडला. महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांमध्ये जून ते ऑगस्ट अखेरीस 32-44% कमी पाऊस झाला.
2. महाराष्ट्रातील धरणांमधील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या 83.60% वरुन 64.37% इतका कमी झाला आहे.
3. खरीप पिकांसह पेरणी केलेल्या क्षेत्रामध्ये 2.72 लाख हेक्टरने घट झाली आहे आणि कडधान्यांसह लागवड केलेल्या क्षेत्रात 15% घट झाली आहे.
5. बदललेल्या पावसाचे स्वरुप आणि खरिपाच्या पेरणीला उशीर झाल्याने यंदाच्या कापणीवर नकारात्मक परिणाम होईल. अन्नधान्य उत्पादन धोक्यात आहे आणि 10-15% कमी होऊ शकते.
राज्यातील अनेक जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील अने जिल्हे तहानलेलेच आहेत. विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र, अन्य भागात पावसाने दडी मारल्याचं चित्र दिसत आहेत. त्यामुळे हातची पिकं वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे राज्यात पाणी टंचाईचं संकट येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
यापूर्वीही सुप्रिया सुळे यांनी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली होती. महाराष्ट्रात जुन, जुलै या महिन्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. त्यातच या ऑगस्ट महिन्यात देखील सरासरीपेक्षा सुमारे 68 टक्क्यांनी पाऊस कमी आहे. 1 ते 18 ऑगस्ट दरम्यान सर्वच विभागांत पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा 80 टक्क्यांनी कमी आहे. बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला नाही. ही परिस्थिती भीषण असून शेतकऱ्यांचे हातचे पीक निघून गेले आहे. हे पाहता या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र शासनाने राज्यात दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी ट्वीट करत केली होती. मात्र त्यानंतरही सरकारने कोणतंही पाऊल उचललं नसल्याने त्यांनी पुन्हा ट्वीट केलं आहे.
इतर महत्वाची बातमी-