Pune Bypoll election : पुणे पोटनिवडणुकीवरुन रस्सीखेच! कसेल त्याची जमीन, संजय राऊताचं ट्वीट, पाठिंबा नक्की कोणाला?
राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी पुणे लोकसभेच्या जागेवरती दावा करायला सुरुवात केली आहे, तर कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे जिंकेल त्याची जागा, असं संजय राऊतांनी ट्वीट केले.
Pune Bypoll election : भाजपचे जेष्ठ नेते आणि खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी निवडणूक आयोगाने सुरू केलेली आहे. या निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र त्याच्या आधीच महाविकास आघाडीत ही जागा कोणी लढायची यावरुन चुरस निर्माण झालेली आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी या जागेवरती दावा करायला सुरुवात केली आहे तर कसेल त्याची जमीन या उक्तीप्रमाणे जिंकेल त्याची जागा, असं संजय राऊतांनी ट्वीट केले. त्यांच्या ट्वीटमुळे पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळत आहे.
या दोन्ही पक्षांच्या रस्सीखेचमध्ये संजय राऊत यांनी ट्वीट करून एक प्रकारे काँग्रेसवरती निशाणा साधला आहे. कसेल त्याची जमीन याप्रमाणे जिंकेल त्याची जागा असं केलं तर कसबा विधानसभेप्रमाणे ही पोटनिवडणूक जिंकता येईल, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. हा मतदारसंघ पूर्वी कोणाचाही असो, जो जिंकून येऊ शकतो त्याची ती जागा अशी राऊतांची भूमिका आहे.
संजय राऊतांनी ट्वीटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
'कसेल त्याची जमीन या प्रमाणे जो जिंकेल त्याची जागा हे सूत्र ठरले तर "कसबा" प्रमाणे पुणे "लोकसभा" पोटनिवडणtक महाविकास आघाडीस सहज जिंकता येईल. जागांचा आकडा वाढविण्याचा हट्ट अनाठायी आहे. जिंकेल त्याची जागा याच सूत्राने महाराष्ट्र आणि देश जिंकता येईल. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी प्रत्येकाने थोडा थोडा त्याग करावाच लागेल, असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
कॉंग्रेस-राष्ट्रवादीत रस्सीखेच
पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयोगाने तयारी सुरू केलेली आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांनीसुद्धा या जागेवर लढायची तयारी सुरू केलेली पाहायला मिळते. भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि माजी खासदार संजय काकडे यांच्या नावाची चर्चा आहे. तर शहराध्यक्ष जगदीश मुळीकदेखील या जागेसाठी इच्छुक आहेत. मात्र महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादीला सोडायची की काँग्रेसला यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झालेली पाहायला मिळते. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचीच ताकद असून गेल्या काही वर्षात काँग्रेसला पुणे लोकसभेची जागा जिंकता आली नाही, असं राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे.
कॉंग्रेस माघार घेणार का?
या जागेसाठी राष्ट्रवादी असली तरी मात्र काँग्रेसही ही जागासहजासहजी सोडेल असं वाटत नाही. आतापर्यंत काँग्रेसने ही जागा अनेकदा लढवलेली आहे आणि 2004 मध्ये सुरेश कलमाडी यांचा विजयी झाला होता. त्यामुळे काँग्रेस माघार घेणार नाही हे स्पष्ट दिसत आहे.