Pune ACB Trap पुणे महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांना (ACB Trap) 16 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली. या महाविद्यलयात व्यवस्थापन कोट्यातून पंधरा विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा नियम असताना मागील तीन वर्षांपासून बावीस विद्यार्थ्यांना प्रत्येकी सोळा ते वीस लाख रुपये घेऊन प्रवेश दिला जात होता. प्रवेशासाठी घेतले जाणारे पैसे ट्रस्टच्या सदस्यांमध्ये वाटले जात होते, असं तपासात समोर आलं आहे. त्यामुळे लाचेच्या स्वरुपात घेतले जात असलेले पैसे नक्की कोणापर्यंत पोहोचत होते याचा खोलात जाऊन तपास करण्याची मागणी होत आहे.


पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात चालणारी लाचखोरी समोर आल्यावर मनसेकडून महाविद्यालयाचे अधिष्ठाता आशिष बनगिनवार यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. काँग्रेसकडून त्यांच्या कार्यालयावर शाईफेक करण्यात आली तर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून महापालकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आलं. लाचेची रक्कम ज्यांच्यापर्यंत पोहचत होती त्या सर्वांवर कारवाई करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. 


तीन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेकडून भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यात आलं. त्यासाठी चोवीस सदस्यांचा एक ट्रस्ट स्थापन करण्यात आला. या ट्रस्टमध्ये बारा लोकप्रतिनिधी आणि बारा प्रशासकीय अधिकारी असतील हे निश्श्चित करण्यात आलं. शंभर विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या महाविद्यालयातील 85 जागा सर्वसाधारण कोट्यातून तर 15 जागा व्यवस्थापन कोट्यातून भरण्याचा ठरलं. मात्र प्रत्यक्षात बावीस जागा व्यवस्थापन कोट्यातून भरल्या जात होत्या आणि त्यासाठी पैसे घेतले जात होते असा आरोप ट्रस्टचे विश्वस्त आलेल्या भाजपचे माजी उपमहापौर डॉक्टर सिद्धार्थ धेंडे केला आहे. 


आशिष बनगिनवार यांनी व्यवस्थापक कोट्यातून प्रवेश देण्यासाठी एका विद्यार्थ्यांच्या पालकांकडे सोळा लाखांची मागणी केली होती. त्यापैकी दहा लाख रुपये स्वीकारताना बनगिनवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. लाचेची ही रक्कम ट्रस्टच्या सदस्यांमध्ये वाटली जात होती, असं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तपासात समोर आला आहे. नियमानुसार महापालिकेचे महापौर या ट्रस्टचे पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर महापालिकेतील विरोधीपक्षनेते आणि इतर नगरसेवक मिळून 12 लोकप्रतिनिधी या ट्रस्टवर आहेत तर महापालिकेचे आयुक्त, आरोग्य विभागाचे प्रमुख आणि इतर अधिकारी मिळून 12 अधिकारी या ट्रस्टवर आहेत. मात्र मागील दीड वर्षांपासून निवडणुका न झाल्याने महापालिकेवर प्रशासकीय राजवट असल्यानं या प्रवेशांशी लोकप्रतिनिधींचा कोणताही संबंध नसल्याचं माजी महापौर मुरलीधर मोहोळांनी म्हटलं आहे. 


लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून बनगिनवार यांच्यासह ट्रस्टवर असलेल्या इतर काही सदस्यांची देखील चौकशी सुरु करण्यात आली आहे. आशिष बनगिनवार हे पुण्यात येण्याआधी गुजरातमधील सुरतमधील एका वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करत होते. दीड वर्षांपूर्वी त्यांना पुण्यात बोलावून महापालिकेच्या वैद्यकीय रुग्णालयांची जबाबदारी सोपवण्यात कोणाचे हितसंबंध गुंतले होते याचीही चौकशी होण्याची गरज आहे.


इतर महत्वाची बातमी-


Pune Metro : पुण्यात मेट्रो स्टेशनचा लोखंडी भाग कोसळला, चारचाकीचे मोठे नुकसान, जीवितहानी नाही