President Rule | राष्ट्रवादी शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपदाची अट ठेवणार?
राष्ट्रवादी शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठेऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांना सत्तास्थापनेचं निमंत्रण राज्यपलांनी टप्प्याटप्याने दिलं होतं. मात्र तिन्ही पक्षांनी अपुऱ्या संख्याबळामुळे सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं.
मुंबई : राज्यात सत्तास्थापनेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देणार की नाही, याचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. सत्तास्थापनेसाठी होत असलेला उशीर नेमका का होतोय, याचं कारण समोर आलं आहे. शिवसेनेने ज्या अटीसाठी भाजपसोबतची 30 वर्षांची युती तोडली, तीच अट आता राष्ट्रवादी शिवसेनेसमोर ठेवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
राष्ट्रवादी शिवसेनेसमोर अडीच-अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला ठेऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेनेही विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपसमोर हीच अट ठेवली होती. मात्र भाजपने ती अट मान्य केली नाही. त्यामुळेच आज कोणताही पक्ष बहुमताचा आकडा नसल्याने राज्यात सत्ता स्थापन करु शकला नाही.
भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या मोठ्या पक्षांना सत्तास्थापनेचं निमंत्रण राज्यपलांनी टप्प्याटप्याने दिलं होतं. मात्र तिन्ही पक्षांना अपुऱ्या संख्याबळामुळे सत्ता स्थापन करण्यात अपयश आलं. त्यानंतर इतर कोणताही पर्याय उरला नसल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज (12 नोव्हेंबर) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली आहे.
राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर भाजप, शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी पत्रकार परिषद घेत सत्तास्थापनेसाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आधी चर्चा होईल. आमच्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पुढे शिवसेनेसोबत चर्चा करु, असं काँग्रेस नेते अहमत पटेल यांनी म्हटलं आहे. तर राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे, आता आम्ही निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्र राज्याचं सरकार स्थापन करणे आणि ते स्थिरपणे चालवणे हा पोरखेळ नाही. त्याकरिता आम्हाला 48 तासांची मुदत पाहिजे होती, पण ती राज्यपालांनी दिली नाही. काल आम्ही प्रथम अधिकृतपणे शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सरकार स्थापनेसाठी पाठिंबा देण्यासंदर्भात संपर्क केला. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र बसू आणि मग कॉमन मिनिमम प्रोग्रामवर चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
तर मला आशा की राज्यात भाजपची सत्ता येईल. सत्ता येण्यासाठी जे जे शक्य असेल ते मी करेन. सत्ता स्थापन करायला भाजपला मी मदत करेन. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक बैठका आजही पार पडल्या. शिवसेना काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाईल, असं वाटत नाही. राज्यात राष्ट्रपती राजवटीला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला.