मुंबई : सत्याच्या शोधासाठी आम्ही कायदेशीर मार्गाचा अवलंब करत आहोत. त्यामुळेच मला खोट्या प्रकरणात अडकवण्याचा आरोप केला जात असल्याचा आरोप प्रवीण कलमे यांनी किरीट सोमय्या यांच्यावर केला आहे. आपण तक्रार केलेल्या एका बेकायदेशीर इमारतीला वाचवण्यासाठी किरीट सोमय्या यांनी हे खोटे आरोप केल्याचं प्रवीण कलमे यांनी म्हटलं आहे. किरीट सोमय्यांनी केलेले आरोप हास्यास्पद असल्याचंही ते म्हणाले. 


किरीट सोमय्यांचे सर्व आरोप हे हास्यास्पद असून आपल्यावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आपल्याला नाही तर किरीट सोमय्यांना कशी कळते  असा सवालही प्रवीण कलमे यांनी केला आहे. प्रवीण कलमे म्हणाले की, "काही विकासकांच्या विरोधात मी मार्च महिन्यामध्ये तक्रार केली होती, त्यावर आर्थिक गुन्हा शाखेने गुन्हा नोंद केला होता. ज्या इमारतीचे इन्स्पेक्शन झालं होतं, त्यातील एका इमारतीच्या विरोधात आपण तक्रार केली होती. त्या बेकायदेशीर इमारतीला वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी आपल्यावर आरोप केला आहे. माझ्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे तर त्याची माहिती मला न मिळता किरीट सोमय्यांना कशी काय देण्यात आली? मला खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात येत आहे."


एसआरए फाईल्समध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोपही प्नवीण कलमे यांनी केला. प्रवीण कलमे म्हणाले की, "नगरविकास खात्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांना या संबंधी मी अनेक पत्र लिहिले आहेत. 31 मार्चला जनहित याचिका दाखल केली. पण तरीही मला वसुलीच्या आरोपामध्ये अडकवण्याचा कट रचला जात आहे."


जी व्यक्ती काही दिवसांपूर्वी फरार होती ती माझ्यावर आरोप करत असल्याचं आश्चर्य वाटतंय असाही टोला त्यांनी किरीट सोमय्यांना लगावला आहे. आपण सध्या कामानिमित्त आखाती देशांमध्ये आलो असून कुठेही पळून गेलो नसल्याचं ते म्हणाले. 


काय आहेत आरोप? 
भाजप नेते किरीट सोमय्या हे प्रवीण कलमे यांच्यावर आरोप करताना म्हणाले होते की, प्रवीण कलमे हे गृहनिर्माण खात्याचे सचिन वाझे आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना 100 कोटी रुपयांच्या वसुलीचे आदेश दिले होते. प्रवीण कलमे यांनी मंत्रालयातील कागदपत्रांची चोरी केली होती.  


प्रवीण कलमे यांना फरार घोषित केलं जावं असंही किरीट सोमय्या म्हणाले होते. 


महत्त्वाच्या बातम्या: