Kishori Pednekar On Ravi Rana : हनुमान जयंती निमित्त उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, अन्यथा आम्ही मातोश्रीबाहेर येऊन हनुमान चालिसा वाचणार, असे आव्हान अपक्ष आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं आहे. रवी राणा यांच्या या आव्हानाला आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिआव्हान दिले आहे. "जे काय करायचं आहे ते आपापल्या भागात करा, दुसऱ्याच्या भागात करू नका, असे सांगत हिंमत असेल तर मातोश्रीबाहेर येऊन दाखवा, आम्ही शिवसैनिक काय आहोत हे तुम्हाला दाखवतो, असे आव्हान किरोशी पेडणेकर यांनी रवी राणा यांना दिले आहे. 


हनुमान जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. जर मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली नाही, तर मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणार असल्याचा इशाराही राणा यांनी दिला आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी रवी राणा यांना मातोश्रीबाहेर येऊन दाखवाच, असा इशारा दिला आहे. 


"शिवसेना भवनला टार्गेट करून रवी राणा स्वत:ची पब्लिसीटी करून घेत आहेत अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली आहे. पेडणेकर यांच्या या टीकेवरही रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा वाचणे याला विरोध असता कामा नये. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी ती शिकवण दिली असून त्यांनीच दिशा दाखवली आहे. त्या दिशेने उद्धव ठाकरे यांचं पाऊल पडलं पाहिजे ही संपूर्ण राज्यातील शिवसैनिकांची इच्छा आहे, असे राणा यांनी म्हटले आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी तुम्ही शिवसैनिक आहात का? असा प्रश्न रवी राणा यांना विचारला. शिवाय मुख्यमंत्र्यांना हनुमान चालिसा वाचायला सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल पेडणेकर यांनी रवी राणा यांना विचारला. 


मुख्यमंत्र्यांनी हनुमान चालिसा वाचली तर राज्यात चांगला संदेश जाईल असे रवी राणा यांनी म्हटले. यावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी काय वाचावं हे सांगणारे तुम्ही कोण? असा सवाल किरोशी पेडणेकर यांनी उपस्थित केला. याबरोबरच मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणे चुकीचं असून मुख्यमंत्र्यांनी वैयक्तिक पातळीवर काय करावे? हा सल्ला रवी राणा यांनी देण्याची गरज नाही, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी रवी राणा यांना लगावला आहे.


महत्वाच्या बातम्या


'हनुमान जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचावी', आमदार रवी राणांचं आव्हान


'मुश्रीफांचा जन्म रामनवमीला नव्हे, तर रंगपंचमीला', समरजीत घाटगेंचा दावा; मुश्रींफ म्हणाले...