जळगाव: राज्यात आपलं सरकार येईल अशी अपेक्षा भाजपला होती, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला आहे. शरद पवार हे जळगावात माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते. 


शरद पवार म्हणाले की, ज्यांचा अपेक्षा भंग झाला ते लोक काहीही करुन हे राज्य ताब्यात कसं घेता येईल हे पाहतात. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडत आहेत.


शरद पवार पुढे म्हणाले की, सामंज्यस्याने प्रश्न सोडवणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येतंय का अशी चिंता आहे. सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे


राज ठाकरेंनी आता हिंदुत्त्वाच्या मार्गावर जायचं ठरवलंय असंही शरद पवार म्हणाले. 


देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, फडणवीसांनी मला जातीयवादी का म्हटलं हे मला माहिती नाही. फडणवीसांनी केलेल्या ट्वीटचा मी आनंद घेतोय. त्यांच्याकडे दुसरं काही बोलण्यासारखं नाही त्यामुळे के तसं बोलतायत.


बाबासाहेब पुरंदरेंवर टीका
मनसेने सादर केलेल्या पुस्तकाला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, जेम्स लेन या लेखकाने शिवाजी महाराजांच्याबद्दल काहीही लिहिलं आहे. त्याने शिवछत्रपती आणि जिजामाता यांच्याबद्दल चुकीचा इतिहास लिहिलाय. अत्यंत गलिच्छ इतिहास लिहिला गेलाय. पण ते जेम्स लेन हा चांगला इतिहास अभ्यासक असल्याचं पुरंदरेंनी म्हटलं. त्यांच्याबद्दलची लोकांनी भूमिका या आधीच स्पष्ट केली आहे.