(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होण्याची शक्यता
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊ घातल्या आहेत. नाणार प्रकल्पाचा शिवसेनेचा कडवा विरोध आहे. त्यामुळे युतीच्या आड येणाऱ्या नाणार प्रकल्पाचा संघर्ष स्थलांतराने मिटणार असं दिसत आहे.
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या नाणार हटाव संघर्षाला यश मिळण्याची शक्यता आहे. कारण नाणारमध्ये उभ्या राहणाऱ्या प्रस्तावित रिफायनरीला आता रायगडमध्ये स्थलांतरित करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. प्रकल्पासाठी योग्य जमिनीचा शोधही सुरु झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून नाणार प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी विरोध केला आहे. त्यातच, शिवसेना सुद्धा या प्रकल्पाच्या विरोधात उभी राहिली असल्याने सध्या या प्रकल्पाच्या भूसंपादनाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. युतीच्या आड येणारा हा प्रकल्प स्थलांतरित करुन रायगड जिल्ह्यात आणण्याचा प्रयत्न असल्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांनी माहिती आहे.
नाणार प्रकल्पासाठी आता रायगड जिल्ह्यातील रोहा ते माणगाव दरम्यानच्या जमिनीची पाहणी करण्यात येत आहे. रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल लिमिटेडच्या सहा अधिकाऱ्यांच्या एका पथकामार्फत पर्यायी जागा शोधण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्ससाठी याआधीच रोहा जवळच्या चमेरामध्ये एमआयडीसीने जागा संपादित केली आहे. या एमआयडीसीला लागून शेकडो एकर खाजगी आणि निझामांच्या वंशजांना दिलेली इनामी जमीन उपलब्ध आहे.
याच जमिनीवर नाणार रिफायनरी प्रकल्पाचा नवा मुक्काम असण्याची शक्यता आहे. या जमिनीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर एक जेट्टीही उपलब्ध आहे. ज्याद्वारे इंडोनेशियाहून आलेला कोळसा उतरवून घेता येणार आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर येऊ घातल्या आहेत. नाणार प्रकल्पाचा शिवसेनेचा कडवा विरोध आहे. मात्र नाणारचा प्रकल्प मुख्यमंत्र्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये तंटा नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आधीच भूसंपादनाला स्थगिती दिली आहे, मात्र प्रकल्प रद्द झाला नाही. नाणार प्रकल्पविरोधी संघर्ष शिवसेनेच्या विरोधात जाऊ शकतो आणि तसं होणं हे संभाव्य युतीसाठी मारक ठरणार आहे.
त्यामुळे युतीच्या आड येणाऱ्या नाणार प्रकल्पाचा संघर्ष स्थलांतराने मिटणार असं दिसत आहे. नव्या जागी विरोध झाला नाही तर नाणार प्रकल्पाचा मार्ग सुकर होऊ शकतो.
नाणार रिफायनरी संघर्ष समिती शिवसेनेविरोधात आक्रमक
दुसरीकडे नाणार रिफायनरी संघर्ष समिती शिवसेनेविरोधात आक्रमक झाली आहे. नाणार प्रकल्पाचा अध्यादेश रद्द केल्याशिवाय शिवसेनेनं युतीची चर्चा करु नये. अन्यथा नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीकडून कोकणात शिवसेनेविरोधात उमेदवार देण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
उमेदवार ठरवण्याबाबत उद्याच्या बैठकीत संघर्ष समिती निर्णय घेणार आहे. कोकणातील एक लाख शिवसैनिक जाहीर कार्यक्रमात शिवबंधन सोडणार आहेत. तर महाराष्ट्रात एक कोटी पत्रकं वाटून शिवसेनेविरोधात प्रचार करणार असल्याचा इशारा संघर्ष समितीने शिवसेना खासदार, आमदारांना पत्राद्वारे दिला आहे.