मुंबई : कुठल्याही कामाची सुरुवात करणं आणि ते काम तडीस घेऊन जाणं सोपं नसतं. आदर्श गाव हिवरेबाजारची कथा देखील अशीच काही आहे. गावाला आदर्श करण्यात मोलाचा वाटा असणारे पद्मश्री पोपटराव पवार यांनी आदर्श गाव बनण्यामागचे काही अनुभव कथन केले. सरपंच झाल्यानंतर पहिल्या ग्रामसभेत लोकांनी समस्यांचा पाढाच वाचला, त्यामुळे कामाला सुरुवात कुठून करावी, हेच कळत नव्हतं, अशी भावना पद्मश्री पुरस्कार जाहीर झालेले आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच  पोपटराव पवार यांनी व्यक्त केली. ते एबीपी माझाच्या माझा कट्टा वर बोलत होते.

ते म्हणाले की सरपंच झाल्यानंतर कामाला सुरुवात कुठून करावी, हेच कळत नव्हतं. मग ठरवलं गावात काम करायला तरुण पिढी तयार करणं आवश्यक आहे. त्यातूनच आम्ही जिल्हा परिषद शाळा आणि व्यायामशाळा दुरुस्तीचे काम हाती घेतल्याचे पोपटराव पवारांनी सांगितले. यासाठी निधी कसा वापरला त्याचाही किस्सा त्यांनी सांगितला. मी सरपंच झालो त्यावेळी ग्रामपंचायतच्या अकाउंटमध्ये 14 हजार होते. यात आम्हाला शाळा आणि व्यायामशाळा दोन्हींची दुरुस्ती करायची होती. जे पैसे खात्यावर होते, ते रोजगार हमी योजनेतील होते. त्यामुळे ते इतर कामात आम्हाला वापरता येईना. पण, यात वृक्षारोपण करू शकत होतो. मग आम्ही सर्वात आधी गावात वृक्षारोपण केलं. या कामांची बिलं काही मुलांच्या नावावर काढली आणि ते पैसे पुन्हा खात्यात जमा केले. त्याच पैशातून शाळेचा पत्रा आणि व्यायाम शाळेत साहित्य घेतल्याचे पोपटराव पवार यांनी सांगितले.


नगरकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा; राहीबाई पोपेरे, पोपटराव पवार अन् क्रिकेटपटू जहीर खानला पद्मश्री

पूर्वी रात्रीच्या शाळेला मुलगी जाऊनही आईवडील निश्चित असायचे -

काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या ऐकून महाराष्ट्र हादरून गेलाय. यावर पद्मश्री पोपटराव पवार यांना विचारले असता, ते म्हणाले, आम्ही ज्यावेळी माध्यमिक शाळेत होतो, त्यावेळी अभ्यासासाठी रात्रीचे वर्ग चालायचे. वर्ग संपल्यावर मुलींना घरी सोडायची जबाबदारी मुलांची असायची. मुलीचे आई-वडील निश्चित झोपलेले असायचे की मुलगी व्यवस्थित घरी येणार म्हणून. आम्ही दुसऱ्या गावात एसटीने जायचो. गावातील मुलं मुलींसाठी जागा पकडून ठेवायचे आणि स्वतः उभं राहायचे. दुसऱ्या गावातील एखाद्या मुलाने मुलीला छेडलं तर दुसऱ्या दिवशी त्या मुलांना आपल्या गावातील मुलांनी मारल्याची बातमी मुलींच्या कानावर यायची.



Padma Shri Award 2020 | हा सर्वांचा सन्मान आहे : पोपटराव पवार | ABP Majha

पुढं ते म्हणाले, पारनेर तालुक्यातीलच एका मुलीनं मला एक मार्मिक पत्र लिहिलं होतं. ती म्हणते मी पदवीच्या दुसऱ्या वर्षापर्यंत आमच्याही गावात अशीच काहीशी परिस्थिती होती. पण, आता मला तोंडाला बांधल्याशिवाय कॉलेजला जाता येत नाही. बसमध्ये गावातील मुलं बाकावर आणि मुली एसटीत उभ्या दिसतात. आता गावातील मुलचं मुलींची छेड काढण्यासाठी बाहेरच्या मुलांची मदत करतात, हे पत्र वाचून फार वाईट वाटल्याच त्यांनी सांगितले.