पंढरपूर : पंढरपूरच्या विठुरायाचे ऑनलाईन दर्शन सशुल्क करण्यासाठी शनिवारी (8 फेब्रुवारी) बोलावलेल्या बैठकीत काही राजकीय पक्ष आणि संघटनांचे प्रतिनिधी आल्याने वारकरी महाराज आणि या मंडळीत जोरदार बाचाबाची झाल्याने विठ्ठल मंदिरात आज अभूतपूर्व गोंधळ झाला . यानंतर या निर्णयाला विरोध करीत या महाराज मंडळींनी बैठकीवर बहिष्कार टाकत बाहेर पडल्याने पुन्हा हा विषय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.


एक वर्षांपूर्वी मंदिर समितीने ऑनलाईन दर्शनासाठी 100 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. याला वारकरी संप्रदायातून टोकाचा विरोध झाल्याने हा निर्णय थांबवला होता. शनिवारी (8 फेब्रुवारी) मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा याच विषयावर विठ्ठल मंदिरात महाराज मंडळींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस , संभाजी ब्रिगेड आणि काही इतर संघटनांचे पदाधिकारी आल्याने वारकरी महाराज आणि यातील काही पदाधिकाऱ्यांच्यात वादावादी सुरु झाल्यावर वारकरी पाईक संघाचे राणा महाराज वासकर, रामकृष्ण वीर महाराज यांचेसह इतर बरेच महाराजांनी बैठकीवर बहिष्कार टाकत निघून गेले.

Sharad Pawar | पंढरपुरात नेहमी जातो पण प्रसिद्धी करत नाही, राजकारण प्रसिद्धीसाठी हा गैरसमज - शरद पवार



यानंतरही बैठक सुरु ठेवण्यात आली. यामध्ये वैष्णव वारकरी सेना, वराकारे फडकरी दिंडी समाजासह काही संघटनांनी या निर्णयाचे समर्थन केले. या वेळी बोलताना ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी मंदिराच्या उत्पन्नात वाढ होत असेल तर हा पैसे भाविकांच्या विकासासाठी वापरता येईल असे सांगत पाठिंबा दिला मात्र याचवेळी रोज येणाऱ्या शेकडो तथाकथित व्हीआयपी मंडळींकडूनही पैसे वसूल करण्याची मागणी केली.

बैठकीनंतर बोलताना मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी या निर्णयाला विरोध करणाऱ्या संप्रदायातील मंडळींशी चर्चा करून त्यांचे मन वळवू असे सांगितले. या बैठकीला राजकीय पक्ष व विविध संघटनांचे प्रतिनिधींना समितीने निमंत्रण दिले नव्हते ते कसे आले ते आपल्याला माहित नसल्याचे सांगत त्यामुळेच वाद झाल्याचे कबुल केले. आता पुन्हा एकदा फक्त सर्व वारकरी संप्रदायाच्या महाराज मंडळींची पुन्हा बैठक बोलावणार असल्याचे सांगत वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनंतरच हा निर्णय लवकरच लागू करू असे सांगितले.

दरम्यान राज्यातील बहुतांश मोठ्या देवस्थानात सध्या सशुल्क दर्शन सुरु झाले असून यामुळे विठ्ठल मंदिराच्या उत्पन्नात वर्षाला किमान 14 कोटी रुपयाची वाढ होणार असल्याची समितीची भूमिका आहे. तर विठ्ठलाच्या दर्शनाचा बाजार मांडू देणार नसल्याची विरोध करणाऱ्या वारकरी संप्रदायातील बहुतांश महाराज मंडळींची भूमिका असल्याने सध्या तरी हा निर्णय पुन्हा मागे पडणार आहे.