'बीजमाता' राहीबाई पोपेरे -
महाराष्ट्रात बियाणांची बँक चालवणाऱ्या 'बीजमाता' राहीबाई पोपेरे यांच्या कामाची दखल सरकारने घेतली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राहीबाई पोपेरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रात वैविध्यपूर्ण प्रयोगासाठी 'नारी शक्ती' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. कठीण परिस्थितीत केलेल्या कामाबद्दल आणि त्यांच्या संघर्षाबद्दल त्यांनी 'माझा कट्टा'वर व्यथा मांडल्यानंतर त्यांच्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले होते. आदिवासी दुर्गम भागात बियाणांची बँक चालवणाऱ्या राहीबाई पोपेरे यांच्या कामाचे कौतुक अनेकांनी केले होते.
शंभरहून अधिक देशी बियाणांचं जतन करणाऱ्या बीजमाता अर्थात राहीबाई पोपरे यांना घर देखील नव्हतं. एबीपी माझाच्या बातमीनंतर चंद्रकांत पाटील यांनी राहीबाई पोपरेंना नगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या कोंबळणे गावात पक्क घर बांधून दिलं होतं. या घराला पावसाळ्यात गळती लागली होती. राहीबाईंच्या देशी बियाणांच्या बँकेला सुरक्षित आसरा मिळावा म्हणून एबीपी माझानं बातम्यांच्या स्वरूपात विशेष मोहीम राबवली होती.
पोपटराव पवार -
आदर्श गाव हिवरे बाजारचे माजी सरपंच पोपटराव पवार यांचं काम संपूर्ण देशभरात परिचित आहे. ते समाजसेवक म्हणून परिचित आहेत. त्यांनी गावातील व्यसनमुक्तीचा लढा यशस्वी केला. ज्यानंतर गावातील लोकांनी त्यांना सरपंच होण्याचा आग्रह केला. सरपंच झाल्यानंतर त्यांनी पीकपद्धतीत बदल केला. कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांना त्यांनी प्राधान्य दिलं. गावात जलसंधारणाची कामे करुन खऱ्या अर्थाने गाव हिरवे केलं. जागोजागी पाणलोटाची कामे केल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा संचय झाला. हिवरे बाजार गावात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, कुपनलिका बंदी असे विशेष प्रयोगही राबवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे गावातील सर्वच घरे महिलांच्या नावावर आहेत. सर्व निर्णय ग्रामसभेला विचारात घेऊनच होतात. चित्रपट अभिनेता आमीर खान यालाही या गावाने भूरळ घातली आहे. पवार हे मूळ क्रिकेटपटू आहेत. त्यांनी विद्यापीठ स्तरावर क्रिकेट खेळले आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांनी कामास सुरूवात केली होती.
भारतीय क्रिकेटर झहीर खान -
मूळचा श्रीरामपूरचा असलेला आणि भारतीय क्रिकेट संघात प्रतिनिधीत्त्व करीत जगात आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण करणाऱ्या झहीर खानला पद्मश्री जाहीर झाला आहे. जहीरचा सन्मान झाल्याची माहिती मिळताच नगरच्या क्रीडा वर्तुळात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामपूरकर तर भलतेच खूश झाले आहेत. झहीरने आपल्या क्रिकेटला शहरातून सुरूवात केली. नगरच्या क्रॉम्प्टन क्रिकेट करंडकातही त्याने अनेकदा सहभाग घेतला होता. प्रारंभी तो बडोद्याकडून खेळला. रणजी क्रिकेट करंडकात त्याने छाप पाडल्यानंतर त्याची भारतीय संघात निवड झाली.
Padma Award | पद्मश्री पुरस्काराचे मानकरी पोपटराव पवार यांची पहिली प्रतिक्रिया | ABP Majha