Beed District Politics : बीड जिल्ह्याच्या राजकारणाला भाऊबंदकीची मोठी किनार आहे. आता हीच भाऊबंदकी एका वेगळ्या टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे. एकीकडे बीडच्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचा वारसा असलेल्या क्षीरसागर कुटुंबांमध्ये घरातून सुरु झालेला भावातील संघर्ष आता थेट हाणामारीपर्यंत पोहोचला आहे. तर गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेल्या धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये देखील कधीच एकोपा पाहायला मिळत नाही. दोन वेगवेगळ्या विचारधारा असलेले हे दोन नेते अभावानेच एका व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. 


संदीप क्षीरसागरांचा पुष्पातील डायलॉग तर योगेश क्षीरसागरांचं मै हु डॉन 


मंडळी केवळ राजकीय व्यासपीठावरच हे राजकीय नेते एकमेकांविरोधात डायलॉगबाजी करतात असं नाही तर प्रत्येक्षात थेट पोलीस स्टेशनपर्यंत एकमेकांविरोधात हाणामारीच्या तक्रारी सुद्धा करतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे बीडचे आमदार संदीप क्षीरसागर आणि जयदत्त क्षीरसागर यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळतोय. कधी संदीप क्षीरसागर पुष्पातील डायलॉग  म्हणतात. तर योगेश क्षीरसागर मै हु डॉन हे गाण म्हणतात.


बीडच्या माजी खासदार केशरकाकू क्षीरसागर यांचा राजकीय वारसा असलेल्या क्षीरसागर कुटुंबियांभोवती मागच्या चाळीस वर्षापासून बीडचे राजकारण फिरत आहे. विशेष म्हणजे आजही टोकाचे मतभेद असलेले क्षीरसागर कुटुंबीय एकाच घरामध्ये राहतात. ज्या बंगल्यात क्षीरसागर कुटुंबातील चार भाऊ आणि त्यांची सगळी मुलं राहतात त्या घरातील माणसं मात्र अभावानेच एकमेकांना भेटतात.


धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्याकडे गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा आला आहे. त्या नेत्यांमध्ये कायम कलगीतुरा रंगलेला पाहायला मिळतो. लोकसभा, विधानसभा निवडणुकीपासून ते बाजार समिती, ग्रामपंचायती निवडणुकीतसुद्धा या दोन नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत. बीड जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे असा संघर्ष ठरलेला आहे.


धनंजय मुंडे आणि प्रीतम व पंकजा मुंडे ही भावंड किमान जिल्ह्यातील अनेक धार्मिक कार्यक्रमात तसेच कौटुंबिक सोहळ्यात एकत्रित पाहायला मिळतात. मात्र क्षीरसागर कुटुंबातील ही राजकीय लढाई या टोकाला जाऊन पोहोचली आहे की, घरातील समारंभालासुद्धा हे राजकीय नेते एकत्रित येत नाहीत.


राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षात काम करणारे अनेक नेतेमंडळी दिवसभर आपल्या पक्षाचा प्रचार करुन एकत्रीतपणे आजही भेटतात. पण वर्चस्ववादाची ही लढाई आता अशा काही टप्प्यावर जाऊन पोहोचले आहे की जिथे नात्यातील ओलावासुद्धा कमी होताना पाहायला मिळतोय. तुम्ही राजकारण जरुर करा पण किमान जनतेच्या विकासासाठी तरी एका व्यासपीठावर या अशीच इच्छा भोळ्याभाबड्या जनतेची असते.


महत्त्वाच्या बातम्या: