Sushilkumar Shinde : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळं काँग्रेसवर मोठी नामुष्कीची स्थिती ओढवली आहे. निर्णायक लढतीत सतत येणार्‍या अपयशामुळे हा पक्ष अस्तित्वहीन होताना दिसतो आहे. स्वतःची ताकद असलेल्या पंजाबसारख्या राज्यातही लाथाळ्यांमुळे काँग्रेसला सत्ता राखता आली नाही. शेतकरी आंदोलनावरून स्थानिक लोकांचा भाजपवर असलेला रोष या पक्षाला मतांमध्ये परावर्तीत करता आला नाही. एका अर्थानं सगळीकडेच नेतृत्व आणि संघटनेच्या पातळीवर काँग्रेस कमकुवत होत असल्याचे चित्र निर्माण झाल्याचं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी म्हटलं आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी दिव्य मराठी या दैनिकात एक लेख लिहला आहे. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या स्थितीची माहिती दिली आहे.


देशात सक्षम विरोधी पक्षाची पोकळी दिवसेंदिवस विस्तारत असताना एका मोठ्या पक्षाचे चिन्ह होणं लोकशाहीच्या दृष्टीने चांगले लक्षण नाही. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये नेमकं कुठं चुकलं, काय करायला हवं आणि देशातील सध्याची एकूणच राजकीय स्थिती याविषयी सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या लेखात भाष्य केलं आहे.


सिद्धू आणि चन्नी यांच्यावरही निशाणा


दरम्यान, सुशिलकुमार शिंदे यांनी आपल्या लेखात पंजाबमध्ये काँग्रेसच्या पराभवाचे खाप हे नवज्योतसिंह सिद्धू आणि माजी मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्यावर फोडले आहे. पंजाबमध्ये या दोघांचे नेतृत्व कुचकामी ठरले आहे. दोघांच्या वर्तणुकीमुळे सरकार येऊ शकले नसल्याचे शिंदे म्हणालेत. पंजाबमध्ये 32 टक्के मागासवर्गीय जनता आहे. तसेच त्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करणारा नेता मुख्यमंत्री असतानाही पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता आली नाही. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाल्याचे शिंदे यांनी म्हटलं आहे. पंजाबमध्ये संघटन आणि प्रशासन या दोन्ही ठिकाणी पक्ष कुमकुवत झाला असल्याचंही त्यांनी सांगितलं.


पंजाबात काँग्रेस होती पण तेथे निवडणुकीच्या सहा महिन्यातील घडामोडीनंतर नवे नेतृत्व आले. नवीन कार्यकारणी घेऊन कामाला सुरुवात झाली. पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून नवज्योत सिंह सिद्धू यांची नेमणूक झाली. क्रिकेटच्या ग्राउंडवर जसं खेळावं तसे त्यांनी राजकारणाच्या ग्राऊंडवर खेळायला सुरुवात केली. पंजाबच्या सद्यस्थितीची त्यांना तशी कल्पनाही नव्हती. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यावर टीका करायला सुरुवात केली. त्यांना मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडू लागले, त्यांच्यात नेतृत्व करण्याची क्षमता नव्हती म्हणून काँग्रेसने मागासवर्गीयांचे नेते असलेल्या चन्नी यांना मुख्यमंत्रीपद दिले असे शिंदे म्हणाले.  मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष  या दोघांनी मनापासून लोकांमध्ये जाऊन काम करायला हवं होतं, मात्र दोघांनीही आपले नेतृत्व कुचकामी असल्याचे सिद्ध केल्याचे शिंदे यावेळी म्हणाले.


परिस्थिती पलटवण्यात सोनिया गांधी यशस्वी होतील  


या लेखात सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे कौतुक केले आहे. 
अनेक कठिण प्रसंगात त्यांनी सरकार आणि पक्ष टिकवून ठेवला आहे. परिस्थिती पलटवण्यात त्या यशस्वी होतील असा विश्वास यावेळी शिंदे यांनी या लेखात व्यक्त केला आहे. तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांच्याकडे क्षमता असल्याचे ते म्हणाले. जे काँग्रेस सोडून गेले आहेत, त्यांना परत आणण्याचे प्रयत्न करायला हवेत. तसेच सर्वधर्मसमभाव माननारी युवकांची फळी तयार करायला हवी असे ते म्हणालेत.