Rajesh Tope On MIM Alliance : राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यात झालेल्या भेटीनंतर एमआयएम आणि महाविकास आघाडीच्या युतीबाबत चर्चा सुरू झाली. इम्तियाज जलील यांच्या भेटीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी भाष्य केले आहे. 


राजेश टोपे यांनी म्हटले, इम्तियाज यांच्यासोबत झालेली भेट अनौपचारिक होती. जलील यांची घेतलेली भेट ही सात्वंनपर होती. काही दिवसांपूर्वी इम्तियाज यांच्या मातोश्रीचे निधन झाले होते. या भेटी दरम्यान, काही मुद्यांवर अनौपचारिक चर्चा झाली. यामध्ये उत्तर प्रदेशमधील निवडणुकीत एमआयएममुळे काही 10-15 जागा पडल्या. भाजपविरोधी आघाडीच्या तेवढ्या जागा वाढल्या असत्या, याकडे लक्ष वेधले. 


त्यावर इम्तियाज जलील यांनी भूमिका मांडताना सांगितले की, अल्पसंख्याक समुदायाचा विकास करणे, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे यासाठी आमचे काम सुरू असते. त्यावर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारकडून अल्पसंख्याक समुदायाच्या विकासासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले असल्याचे टोपे यांनी जलील यांना म्हटले. एमआयएमसोबतच्या युतीच्या प्रस्तावावर पक्षातील नेते निर्णय घेतील, असेही टोपे यांनी सांगितले. 


विकासाच्या मुद्यांबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करा अशी सूचना केली असल्याचे टोपे यांनी म्हटले. ही चर्चा सहजपणे झाली होती. या भेटीत एमआयएमची भूमिका ही कट्टरतावादी आहे. कट्टरतावादी भूमिका सोडावी असेही जलील यांना सांगितले असल्याचे टोपे यांनी सांगितले. 


इम्तियाज जलील काय म्हणाले?


ओवेसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवली आहे.  महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलं आहे. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केली आहे. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे.  राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आली आहे. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं आहे.  शिवसेनेसोबतही आघाडीची एमआयएमची तयारी असल्याचं बोललं जातंय.


इतर महत्त्वाच्या बातम्या: