अर्ध्यावरती डाव मोडला, नशिबी आली जेल!
लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कंटाळा आल्याने लोक शेतशिवारात डाव मांडू लागले आहे. असाच एक डाव लातुरातील कोळपा येथे रंगला होता. मात्र, पोलिसांची रेड पडली अन् हा डाव अर्ध्यावरच मोडला.
लातूर : लॉकडाऊनमध्ये अनेकजण घरी बसून कंटाळले आहेत. त्यामुळे घरातच अनेकजण आता वेगवेगळे खेळ खेळताना दिसत आहेत. काहीजण मोबाईलमध्ये डोकं घालून गेम खेळतायेत. तर, कॅरमच्या खेळण्यातही कुटुंबातील सदस्य रमले आहेत. या काळात अनेक जुन्या खेळांनाही आता सुगीचे दिवस आले आहेत. मात्र, काहींना कितीही सांगितलं तरी घरात बसवत नाही. अशांनी आता शेतशिवारात डाव मांडण्यास सुरुवात केली. असाच एक डाव पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीन हाणून पाडला. पण, शेतशिवारात चाललेल्या या डावाच्या ठिकाणच्या सोयी पाहून पोलीसही अवाक झाले.
लॉकडाऊनमध्ये काहीच मिळत नसताना जर एकाच ठिकाणी टाईमपास करण्यासाठी पत्ते, चहा, गुटका, दारू, बियर यांच्या सोबत चकणा असा बेत असल्यास कोण शौकीन त्याठिकाणी जाणार नाही. मात्र, अशा ठिकाणांवर पोलिसांच्या ड्रोन कॅमेऱ्याची नजर तुमच्यावर पडली. तर पळता भुई थोडी होईल, काहीशी अशीच घटना लातुरात घडली आहे. लॉकडाउनच्या काळात शेतशिवारात 52 पत्त्याचा डाव रंगला होता. ह्या रंगलेल्या खेळात पोलिसांनी मिठाचा खडा टाकावा आणि संपूर्ण डाव उधळून लावावा असा प्रसंग घडला. त्यामुळे राणी रुसली, राजा शिवारात फसला, गुलाम सगळे पोलिसांच्या हाती लागले आणि टाईमपास करायला गेले होते त्यांना पोलिसांचे फटके बसले.
Uddhav Thackeray | मला जीव वाचवायचेत, राजकारण करायचं नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पोलीस आले अन् अर्ध्यावरच डाव मोडला कोळपा येथे भर दुपारी नांगरलेल्या शेतात एका झाडाच्या खाली पत्त्यांचा डाव रंगला होता. या ठिकाणी लातूर कोळपा आणि कासारखेडा या गावातील लोक पत्त्याच्या अड्डयावर आले होते. घरी काय करावे, बाहेर पोलीस येऊ देत नाहीत. मग शेतात पत्ते खेळण्यासाठी लोक जमले. ही माहिती गावभर पसरल्याने या ठिकाणची गर्दी वाढू लागली. तशी खबर पोलिसांना लागली. पोलिसांनी चार पथकं तयार केली. सोबतीला ड्रोन कॅमेरा घेतला आणि रेड केली. पत्ते खेळणाऱ्या जुगाऱ्यांची पळता भुई थोडी झाली. पोलीस आलेत हे कळल्यावर अनेकांनी जवळील पैसे काळ्या रानात लपून ठेवले. काही धडपडले, पळताना पडले. पोलिसांनी 24 लोकांना ताब्यात घेतले. एक लाख 54 हजाराचा मुद्देमाल हाती लागला. आठ लोक पळून गेले. त्या लोकांचा शोध सुरु आहे. या अड्ड्यावरील सोय पाहून पोलिसही अवाक झाले. चहा, गुटका, दारू, बियर, चकणा आणि शेतातील झाडाखालची सावली. मग काय लॉक डाऊनमध्ये एवढ्या सोयी मिळत असतील तर पत्ते खेळणाऱ्याची रांग लागणारच. मात्र, पोलिसांचे फटके बसल्यावर सगळं कसे हवेत विरले.
Coronavirus | उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, वाशिममध्ये नवे रुग्ण नाही! ग्रामीण महाराष्ट्राने करुन दाखवलं, शहरातल्या गर्दीने मात्र गमावलं