Sangli Crime : मिरज शहरात दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या 5 दरोडेखोरांचा डाव पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी 5 आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका अल्पवयीनचा समावेश आहे. त्यांच्याकडून दरोड्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य कटावणी, सळी, हातोडा, मिरची पूड जप्त केली. पोलिसांनी 30 हजार 145 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.


पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये श्रीशैल राम राजमाने (वय 30 सुभाषनगर, मिरज), अंनिस अल्ताफ सौदागर (वय 25, रा. कुपवाड रस्ता, मिरज), हनिफ रज्जाक शेख (वय 24), रियाज उर्फ मिर्गी बडेसाहेब शेख (वय 40, दोघेही रा. म्हाडा कॉलनी, मिरज) अशी त्यांची नावे असून आरोपींमध्ये अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. 


मिरज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल मंगळवारी रात्री महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस उपनिरीक्षक कुमार पाटील यांना दरोड्याच्या तयारीत असलेले 5 जण रेल्वे पोलिस लाईनजवळ खोक्याच्या पाठीमागे लपल्याची माहिती मिळाली. या घटनेची माहिती मिळताच उपनिरीक्षक पाटील यांनी तातडीने सहाय्यक निरीक्षक रवीराज फडणीस यांना याबाबत माहिती दिली.


कारवाईचे आदेश मिळताच उपनिरीक्षक पाटील यांनी सहाय्यक उपनिरीक्षक सुभाष पाटील, उदय कुलकर्णी व अन्य पोलिस पथकासह 5 जणांवर छापा टाकला. छापा टाकून त्यांची झाडाझडती केली असता त्यांच्याकडे कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, मिरची पूड, लोखंडी सळी, हातोडा आणि दोन मोटारसायकली आढळून आल्या. 


इतर महत्त्वाच्या बातम्या