सांगली: रणांगण आल्यावरच जे काय आहे ते करायचं ही माझी सवय आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांच्या राज्यसभा निवडणुकीतील विजयावर त्यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. जिल्हा परिषद, महापालिका निवडणुका अजून लांब आहेत, सगळ्याच निवडणुका अजून लांब आहेत. ज्यावेळी प्रत्यक्ष लढाई असते त्यावेळी आम्ही त्या निवडणूकीत कसं उतरतो हे सगळ्यांनाच माहीत आहे असं ते म्हणाले.


कोल्हापूरचा विकास करणं आणि कोल्हापूरला पुढे घेऊन जाणं हे आमचं ठरलंय असंही सतेज पाटील म्हणाले. सांगली शहरातील झुलेलाल चौक येथील  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या नामफलकाचे अनावरण सतीश पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी माध्यमांशी बोलताना सतेज पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली. यावेळी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांच्यासह काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. 


गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले की, "राज्यसभेच्या अनुभवातून आम्ही काही गोष्टी शिकलो आहोत. विधानपरिषदेमध्ये कुठेही दगाफटका होणार नाही. महाविकास आघाडीचे सगळे आमदार विधानपरिषदमध्ये आमच्या बरोबर राहतील असा मला विश्वास आहे. लोकशाहीमध्ये स्थित्यंतरं होत असतात आणि या स्थित्यंतरात कोल्हापूरमध्ये जे काही घडलंय ते आम्ही स्वीकारतो. पण जनतेतून ज्या काही निवडणुका झाल्या त्यामध्ये लोकांचा कल हा पाच-सहा वर्षात स्पष्ट झालेला आहे."


राज्यसभा निवडणुकीत अनावधानाने काही गोष्टी घडल्या आहेत, त्याची पुनरावृत्ती विधानपरिषदेत होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ. राज्यसभेतील अनुभव ताजा आहे, त्यामुळे आम्ही विधानपरिषद निवडणुकीत डोळे बंद करून बसणार नाही. आम्ही सुधारणा करू असा विश्वास सतेज पाटील यांनी व्यक्त केला. राज्यसभेच्या वेळी काही अडचणी आल्या आणि त्यातून महाविकास आघाडीला थोडं मागे जावं लागलं असलं तरी या अनुभवातून विधानपरिषदेमध्ये निश्चितपणे महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार विजयी होतील.


चंद्रकांत दादांना वाटतं तसं  होणार नाही
सतेज पाटील पुढे म्हणाले की, "चंद्रकांत पाटील भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांचा विजय झाल्यामुळे जे यश मिळाले तसंच सगळंच यश भाजपला  मिळेल असं चंद्रकांत दादांना वाटत असेल, पण ते तसे घडणार नाही. राज्यसभेतील अनुभव ताजा आहे, अगदी चार दिवसांपूर्वीच निकाल लागलाय. त्यामुळे आम्ही विधानपरिषद निवडणुकीत डोळे बंद करून बसणार नाही. आम्ही नक्की सुधारणा करू."


पाच लोकांना माहीत असणारी ईडी आता गल्लीत देखील माहीत झाली 
देशामध्ये सध्या सूडाचे राजकारण सुरू आहे असं सांगत सतेज पाटील म्हणाले की, "पूर्वी पाच लोकांना ईडी माहीत होती , आता ती  गल्लीत देखील माहीत झालेय.  या देशात ईडीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतोय . सरकारच्या विरोधात कोण बोलत असेल त्याच्या मागे ईडी लावा हे आता सुसूत्र बनलेय. राहुल गांधी यातून सहीसलामत बाहेर पडतील याचा आम्हाला विश्वास आहे."