BJP Jal Akrosh Morcha: जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या विरोधात आज भाजपकडून 'जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित हा मोर्चा काढण्यात आला होता. शहरातील मामा चौक ते गांधी चमनपर्यंत हा भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी फडणवीस आणि दानवे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तर त्यांच्या टीकेला शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी उत्तर दिले. नेमकं काय घडलं दिवसभरात जालन्यात पाहू यात...


1) सकाळी साडेअकराच्या दरम्यान मामा चौकातून भाजपच्या 'जल आक्रोश मोर्च्या'ला सुरवात झाली. यावेळी फडणवीस आणि दानवे यांची प्रमुख उपस्थिती पाहायला मिळाली 


2 ) यावेळी फडणवीसांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. भाजपला उशिरा सुचेलेलं शहाणपण म्हणणाऱ्या अर्जन खोतकर अडीच वर्ष तुम्ही झोपून होता का? असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.


3 ) सरकराला समान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घ्यावी लागेल, जे सरकार सामन्या माणसाच्या आक्रोशाची दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही. आमच्या काळात 129 कोटी रुपये जालन्याच्या पाण्यासाठी दिले होते. आता अडीच वर्षे झाले त्या पैश्याच या सरकारने काय केलं असा प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला.     


4 ) औरंगाबादमध्ये आम्ही काढलेल्या आमच्या मोर्च्यामुळे किमान सरकार सरकार जागं झालं, मुख्यमंत्री यांना यावं लागलं,घोषणा करावी लागली आणि काही काम सुरु झालं. तसेच इथेही करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले.  


5) जोपर्यंत तुम्ही सामन्या माणसाला न्याय देणार नाहीत तोपर्यंत आम्ही तुम्हाला झोपू देणार नाही,तुम्हाला कारभार चालवू देणार नाही आणि एक-एक दिवस तुमचा भारी करू असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिला आहे. 


6 ) यावेळी रावसाहेब दानवे यांनी सुद्धा महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला.सिल्लोडचा औरंगजेब माझ्यावर टीका करायला भाड्याने सोडलाय, दम असेल तर समोर या एकाच स्टेजवर असा इशाराही दानवे यांनी सत्तार यांना दिला आहे.  


7 ) सत्तधारी पक्षाचे लोकं फक्त निवेदन देण्याचे काम करतात. पण अडीच वर्षात आणले काय असा प्रश्न दानवे यांनी विचारले. आम्ही म्हणतो पाणी पाजलं पाहिजे. काही लोकं नाटक करतात, असे म्हणत दानवे यांनी खोतकर यांच्यावर सुद्धा टीका केली.


8 ) भाजपकडून करण्यात आलेल्या टीकेला अर्जुन खोतकर यांनी सुद्धा उत्तर दिले आहे. भाजपकडून जालना शहरात काढण्यात आलेला 'जल आक्रोश मोर्चा' म्हणजे फुसकाबार होता, असा खोचक टोला खोतकर यांनी लगावला आहे.   


9 )  फडणवीस यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला मोर्चासाठी आणलं पण, मोर्चा फुसकाबार निघाला. हा मोर्चा कुणाच्या विरोधात हे कळलेच नाही. गेली 10 वर्ष सत्तेत असताना काय झाले. मुळात स्थानिक पातळीवर काँग्रेस आणि भाजपचा साखरपुडा झाला आणि मधुचंद्र झाला, असेही खोतकर म्हणाले.


10 ) आम्हाला खिशात ठेवण्याच दानवे म्हणाले, याचा अर्थ त्यांचे खिसे आता मोठे झालेत, ते किती मोठे झालेत हे त्यांच्या जावयाच सांगतील. कोणी काय केले हे समोरा-समोर येउत, आव्हान स्वीकारू, घोडा मैदान जवळ असल्याचं खोतकर म्हणाले.