Sarsenapati Hambirrao : सरसेनापती हंबीरराव चित्रपटामुळे (Sarsenapati Hambirrao) अभिनेते प्रवीण तरडे (pravin tarde) चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. या कौतुक करणाऱ्यांच्या यादीत सौरभ राजू शेट्टी यांचंही नाव जोडलं गेलं आहे. त्यांनी वडील राजू शेट्टी यांच्यासह प्रवीण तरडे यांची भेट घेतली.


सरसेनापती हंबीरराव चित्रपटाला मिळालेल्या भरघोस यशाबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी प्रवीण तरडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. या भेटीनंतर सौरभ शेट्टी यांनी सोशल मीडियात पोस्ट शेअर केली आहे. 


ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, काल कामानिमित्त साहेबांच्या सोबत पुण्याला आलो होतो, आणि गाडीमध्ये बसताना सरसेनापती हंबीरराव या चित्रपटासंदर्भात चर्चा रंगली. हंबीरराव मोहिते यांची अभिनय करणारे अभिनेते प्रवीण तरडे यांच्या अभिनयाचे मी खूप कौतुक केलं आणि मी इच्छा व्यक्त केली की मला आज भेटायचं आहे. आणि साहेबांनी प्रवीण तरडे यांना फोन केला. वटवृक्ष एंटरटेनमेंटचे मालक देऊळ बंद पिक्चर निर्माते बापू वाणी यांच्या घरी भेटायचं ठरलं. 


बापू वाणी यांच्या घरी पोहोचताच बापू आणि प्रवीण तरडे यांनी साहेबांचे स्वागत करून घट्ट मिठी मारली आणि तेवढ्यात साहेबांनी माझी ओळख करून दिली. तेवढ्यातच प्रवीण तरडे म्हणाले "बाळा तू माझाच आहेस पण मी तुझ्या वडिलांचा खूप मोठा चाहता आहे. ज्या पद्धतीने शेती साहेब शेतकऱ्यांसाठी त्यांच्या हक्कासाठी लढतात त्यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे" असं म्हणत त्यांनी साहेबांच्या कामाचं कौतुक केलं. तब्बल दीड-दोन तास आम्ही चर्चा केली गप्पा मारल्या आणि आदरणीय राजू शेट्टी साहेबांना आणि मला प्रविणजी सरसेनापती हंबीरराव चित्रपटातील काही क्षण टीव्हीवर दाखवले. 


 इतर महत्त्वाच्या बातम्या