सांगली : प्रियकराने प्रेयसीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना सांगली जिल्ह्यात घडली आहे. ताई सचिन निकम (रा. बलवडी ता. खानापूर वय 32 वर्षे) असे मृत प्रेयसीचं नाव असून याप्रकरणी तिचा प्रियकर संशयित आरोपी राहुल सर्जेराव पवार (वय 31 वर्षे रा. सावरकरनगर, विटा. ता. खानापूर) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून कडेगाव पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ज्वेलर्स मालक असलेल्या आपल्या प्रियकराकडे या तरुणीने एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली होती. परंतु त्याने नकार दिल्यानंतर आपल्या प्रेमसंबंधांची माहिती तुझ्या वडिलांना देईन, अशी धमकी तरुणीने दिली होती. त्यानंतर तरुणाने तिचा गळा आवळून खून केला.
नदीत सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला
विवाहित असलेल्या ताई सचिन निकमचे राहुल सर्जेराव पवारसोबत प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधांची माहिती वडिलांना देण्याची धमकी दिल्याने संतापवलेल्या राहुल पवारने तिचा ओढनीने गळा आवळून खून केला आणि मृतदेह कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीत येरळा नदी पात्रात फेकून दिला होता. पोलिसांनी या ठिकाणी जाऊन खात्री केली असता तिथे एका स्त्रीचा मृतदेह ज्याचं वय अंदाजे 25 ते 30 वर्ष नदी पात्रात तरंगत असल्याचं दिसलं. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने जागीच पोस्टमॉर्टेम केलं. हा मृतदेह ताई सचिन निकमचा असल्याबाबत खात्री केली. नोतवाईकांनी मृतदेहाच्या अंगावरील कपडे आणि पैंजण ओळखले. त्यानंतर तिचा पती आणि नातेवाईक यांच्याकडे चौकशी करुन अधिक माहिती घेतली. मृत ताई निकम ही विटा इथे भाड्याच्या घरी राहत होती आणि इथल्या हॉटेलमध्ये भाकरी, चपाती करण्याचं काम करत होती.
असा केला खून!
याबाबत गोपनियरित्या माहिती घेतली असता विटा इथल्या रेणुका ज्वेलर्स मालक राहुल पवारचे मृत ताई सचिन निकमसोबत अनैतिक संबंध असल्याचं समोर आलं. त्यानंतर ताई निकम आणि राहुल पवार यांचे एकमेकांना भरपूर कॉल झाल्याचं दिसून आलं. यावरुन राहुल सर्जेराव पवार याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुमारे दीड वर्षापासुन ताई सचिन निकमसोबत प्रेमसंबंध असून तिने 3 जून रोजी दुकानातून तिच्या वाढदिवसासाठी एक ग्रॅम सोन्याची अंगठी मागितली. पण अंगठी न दिल्याच्या कारणावरुन तिने प्रेमसंबंधाबाबत वडिलांना सांगेन, अशी धमकी दिली. यावर चिडून 5 जुन रोजी राहुल पवार ताई निकमला घेऊन कडेगाव, सैदापूर, शामगाव घाट मागे, चोराडे फाटा मार्गे विट्याकडे येत होता. यावेळी ढाणेवाडी गावच्या हद्दीत डांबरी रोडच्या कडेला चारचाकी गाडी थांबवून गाडीतच तिचा गळ्यातील ओढणीने गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह गाडीतून भिकवडी खुर्द गावाच्या हद्दीतील येरळा नदी पुलावरुन फेकला. दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी राहुल पवारला अटक केली आहे.