मुंबई : अल्पवयीन पीडितेची निरागसता सत्यच सांगते, त्यामुळे तिची साक्ष आरोपीला शिक्षा देण्यास पुरेशी असल्याचं मत हायकोर्टानं एका निकालात नोंदवलं आहे. तसेच एका शिक्षकानं मुलांसाठी रक्षक किंवा पालक म्हणून काम करणं अपेक्षित आहे. मात्र, याप्रकरणी आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या मौलानानं (मुस्लिम धर्मगुरू) अल्पवयीन मुलीसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यांमुळे पीडितेच्या मानावर आयुष्यभरासाठीचा मानसिक आणि भावनिक आघात झाला आहे. या अल्पवयीन पीडितेला यातनं बाहेर पडणं सहज शक्य नाही, असं आपल्या आदेशात नमूद करत लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातंर्गत मुंबई सत्र न्यायालयातील (पोक्सो) विशेष न्यायाधीश सीमा जाधव यांनी आरोपीला 20 वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.
काय घडली होत घटना?
आठ वर्षीय पीडित चिमुरडी आणि आरोपी हे मुंबईतील कुर्ला परिसरात एकाच इमारतीत वास्तव्यात होते. आरोपी सलमान अन्सारी (38) हा एक मौलाना आहे. पीडित मुलगी दररोज अरबी भाषेतील कुराण शिकण्यासाठी आरोपीच्या घरी जात होती. 6 मे 2019 रोजी पीडिता नेहमीप्रमाणे आरोपीच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीनं तिच्यावर लैंगिक अत्याचार करून यासंदर्भात कोणाकडेही वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी तिला दिली होती. मात्र घाबरलेल्या अल्पवयीन पीडितीनं घरी परतल्यावर घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर आईनं सलमानविरोधात पोलीस ठाण्यात जात गुन्हा दाखल केला.
मात्र पीडितेचं कुटुंब हे सुन्नी पंथीय तर आपण देवबंदी पंथाचे असल्यामुळे त्यांनी धार्मिक शत्रुत्वामुळे आपल्याविरोधात हा खोटा आरोप केल्याचा दावा आरोपीच्यावतीनं करण्यात आला. तसेच पीडिता आणि तिचे कुटुंबिय हे बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित असल्याचा आरोपही केला गेला होता.
कोर्टाचं निरीक्षण
पीडितेची आई आणि आरोपी जरी वेगवेगळ्या पंथांचं पालन करणारे असले तरी ते दोघेही मुस्लिम धर्मीय असल्यामुळे इथे जातीय वाद-विवादाचं कारण आरोपांमागे असल्याचं दिसत नाही. याशिवाय कोणतीही आई आपल्या मुलीचा वापर अशा कारणासाठी करणार नाही, ती देखील स्त्री असून असे खोटे आरोप करून आपल्या मुलीचं चारित्र्य हनन करत तिचं भविष्य धोक्यात घालणार नाही, असंही न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केलं आहे. निव्वळ पीडितेच्या साक्षीच्या आधारावर आरोपीला दोषी ठरवलं जाऊ शकतं. पीडिता ही अल्पवयीन असल्यामुळे तिची निरागसता आणि निःपक्षपातीपणा सत्य सांगण्यास पुरेश्या साक्षीदार असतात. पीडित मुलगी ही घटनेच्यावेळी निव्वळ आठ वर्षांची होती. तर आरोपी हा अनोळखी माणूस नसून तिचा शिक्षक होता.
मुलांच्या भवितव्यावर प्रभाव टाकण्याची ताकद शिक्षकात असते. मात्र, एखाद्या विश्वासू व्यक्तीच्या अशा कृत्यांमुळे मुलांची जीवनाकडे सकारात्मक मार्गानं पाहण्याचा दृष्टीकोनच बदलून जातो. या प्रकरणात पीडितेनं नुकतचं आयुष्य समजण्यास आणि जगण्यास सुरुवात केलेली असतानाच ती या लैंगिक अत्याचराला बळी पडली. त्यामुळे आरोपीवर कोणत्याही प्रकारची दया दाखवता येणार नाही, असं आपल्या आदेशात नमूद करून न्यायालयानं आरोपी अन्सारीला आयपीसी कलम 376 आणि पोक्सो कलम 6 (लैंगिक अत्याचार) अंतर्गत दोषी ठरवत 20 वर्षांची शिक्षा दिली.