Rajni Patil : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना (Farmers) मदत करण्याच्या मुद्यावरुन काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील (MP Rajni Patil) यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्याप कुठलीच मदत मिळाली नाही. याची विचारणा बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांना केली असता ते अनापेक्षित उत्तर देत असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. हे सरकार शेतकऱ्यांची जबाबदारी घ्यायला तयार नसून, उलट त्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याची टीका खासदार रजनी पाटील यांनी सरकारवर केली. पिक विमा न देणाऱ्या कंपन्यांवर सरकारनं गुन्हे दाखल करायला पाहिजेत असं देखील यावेळी रजनी पाटील म्हणाल्या.


बीडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी बीडमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. या बैठकीला काँग्रेसच्या खासदार रजनी पाटील उपस्थित होत्या. बैठक झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी या बैठकीबद्दल नाराजी व्यक्त करत राज्य सरकारवर जोरदार टीका केली. बीडच्या रेल्वेला मूळ मंजुरी आम्ही आणली होती. पण दुर्दैवानं आमचा उल्लेख कुठेच होत नसल्याचे त्या म्हणाल्या. मी खासदार झाले तेव्हा पहिल्यांदा बीडच्या  रेल्वेला मूळ मंजुरी आणली होती. बीडला रेल्वे यावी यासाठी स्वातंत्र्य सैनिक आणि आम्ही मिळून एक मोठ आंदोलन उभा केलं होतं. मात्र, यामध्ये दुर्दैवानं आमच्या नावाचा उल्लेख सध्या कुठेच होताना दिसत नाही, आता एवढीच अपेक्षा आहे की आमच्या डोळ्यासमोर रेल्वे आली आहे तर ते काम पूर्ण व्हावं असेही पाटील म्हणाल्या.


राष्ट्रवादीने आम्हाला काही जागा लढण्यासाठी सोडल्या पाहिजेत


विधानसभा, लोकसभा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये एवढेच नाही तर शिक्षक आमदाराच्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही अनेक वेळा पाठिंबा दिला आहे. मात्र, आमच्या पण कार्यकर्त्यांची इच्छा असते की निवडणूक लढवली पाहिजे. त्यामुळं राष्ट्रवादीनं जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये तरी आम्हाला जागा सोडाव्यात अशी अपेक्षा खासदार रजनी पाटील यांनी व्यक्त केली आहे.