मुंबई: केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल तसेच घरघुती सिलेंडरच्या किंमतीत घट केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आधी भरमसाठ किंमती वाढवायच्या, आणि नंतर मात्र त्या नाममात्र कमी करण्याचा देखावा करायचा अशी टीका राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर केली आहे.  


पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी कर आणखी कमी करावयास हवे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या वतीने एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, केंद्र सरकारने दोन महिन्यांपूर्वी पेट्रोलवरचा अबकारी कर प्रति लिटर 18.42 रुपये इतका वाढविला होता आणि आज तो 8 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली आहे. डिझेलवरील अबकारी कर देखील 18.24 रुपयांनी वाढविला होता आणि आता 6 रुपयांनी कमी केल्याची घोषणा केली. आधी किंमती भरमसाठ वाढवायच्या आणि नंतर नाममात्र कमी करून दर कमी केल्याचा आव आणायचा हे बरोबर नाही. आकडेवारीच्या जंजाळात नागरिकांना अडकवून न ठेवता सहा सात वर्षांपूर्वी असलेल्या अबकारी कराइतकी कपात केल्यास खऱ्या अर्थाने देशातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. 


दरम्यान राज्यातील भाजप नेत्यांनी केंद्राच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. केंद्रातील मोदी सरकारने अबकारी कर कमी केला आहे, आता राज्यातील भाजप सरकारने देखील कर कमी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. 


दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीनं पेट्रोलवरील अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्र सरकारने घरघुती सिलेंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडरची किंमत ही 200 रुपयांनी कमी झाली आहे. हे अनुदान वर्षभरातील 12 सिलेंडरवर देण्यात येणार आहे.