नवी दिल्ली : वाढत्या महागाईमुळे हैराण झालेल्या सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने घरघुती सिलेंडरवर 200 रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता एलपीजी सिलेंडरची किंमत ही 200 रुपयांनी कमी झाली आहे. हे अनुदान वर्षभरातील 12 सिलेंडरवर देण्यात येणार आहे. ही दरकपात तात्काळ लागू करण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे. 


घरगुती वापराच्या 12 सिलेंडरपर्यंत, 200 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. याचा फायदा हा 9 कोटी उज्ज्वला योजना धारकांना होणार आहे. त्यामुळे केंद्राला दरवर्षी जवळपास 6100 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.


गुरवारी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरांमध्ये 3 रुपये 50 पैशांची वाढ झाली होती तर, व्यावसायिक गॅस सिलेंडर आठ रुपयांनी महागला होता. त्यामुळे देशातील प्रमुख शहरांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती या 1000 रुपयांच्या वर गेल्या होत्या. आधीच महागाईने होरपळलेल्या सर्वसामान्य जनतेच्या खिशाला यामुळे कात्री लागली होती. आता त्यामध्ये तब्बल 200 रुपयांची कपात करण्यात आली आहे. 


 






पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात
एकीकडे महागाईमुळे सामान्य जनता होरपळली जात असताना केंद्राने दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पेट्रोलवरील केंद्रीय अबकारी कर हा 8 रुपयांनी तर डिझेलवरील अबकारी कर हा 6 रुपयांनी कमी करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किमतीमध्ये 9.50 रुपये तर डिझेलच्या किमतीमध्ये 7 रुपयांची घट होत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ही घोषणा केली आहे.