पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ; कोरोनामुळे रिकामी झालेली तिजोरी भरण्यासाठी निर्णय
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही दरवाढ 1 जून पासून लागू करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेल मधून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
मुंबई : लॉकडाऊन झाल्याने महसुलाअभावी निर्माण झालेली आर्थिक पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविले आहेत. महसुलासाठी पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धित करात प्रति लिटर प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोमवारपासून (1 जून) राज्यात मुंबईपासून ते गडचिरोलीपर्यंत सर्वत्र पेट्रोल व डिझेल दोन रुपयांनी महाग होणार आहे.
देशभरात 25 मार्चपासून टाळेबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. उद्योग-व्यवसाय, वाहतूक सर्वच आर्थिक व्यवहारांना त्यामुळे फटका बसल्याने राज्याच्या तिजोरीत पडणारा महसूल आटला. यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. वस्तू व सेवा करामुळे राज्य सरकारच्या हातात करवाढीसाठी फारसे उपाय उरलेले नाहीत. त्यामुळे वित्तविभागाने हा निर्णय घेतला.
महसूल गणित
राज्यात दरमहा सरासरी 11 लाख 66 हजार किलोलिटर पेट्रोल व डिझेलची विक्री होते. एक किलोलिटर म्हणजे एक हजार लिटर. म्हणजेच राज्यात दरवर्षी सुमारे 1 कोटी 39 लाख 92 हजार किलोलिटर पेट्रोल-डिझेलची विक्री होते. 2019-20 मध्ये राज्य सरकारला पेट्रोल व डिझेलवरील मूल्यवर्धित करातून एकूण 24 हजार 900 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता.
Petrol Diesel Price | पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ
राज्याला महसुलाची गरज असल्याने पेट्रोल व डिझेलवरील करात प्रत्येकी दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या करवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या विक्रीतून मिळणाऱ्या महसुलात दरमहा 300 कोटी रुपयांची वाढ होईल. या आर्थिक वर्षांतील एप्रिल व मे हे दोन महिने गेल्यामुळे आता पुढील 10 महिन्यांत तीन हजार कोटी रुपये करवाढीतून अतिरिक्त मिळतील.