विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यानंतर पंकजा मुंडे यांचं ट्वीट!
विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे आणि विनोद तावडे यांना डावलून नवीन चेहऱ्यांना संधी दिली. यानंतर पंकजा मुंडे यांनी ट्विटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या. "तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही" असं म्हणत पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना दिलासा दिला.
बीड : विधानपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारली गेल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना ट्विटरवर व्यक्त केल्या आहेत. या ट्वीटमध्ये पंकजा मुंडे यांनी भाजपच्या या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पंकजा मुंडेंना कदाचित याची कल्पना होती का याची चर्चा होऊ लागली आहे.
या विधानपरिषद निवडणुकीमध्ये भाजपने केवळ पंकजा मुंडे यांना डावलले असे नाही, तर विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ खडसे यांच्यासारख्या दिग्गजांना बाजूला सारत नवे चेहरे समोर आणले. भाजपमध्ये पक्ष नेतृत्वाकडून डावलले जात असल्याचा आरोप पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन केला होता.
पंकजा मुंडे यांचे ट्वीट..
आईंना..ताईंना फोन करुन दु:ख व्यक्त करतायत. पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना 'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशीर्वाद आहेत. दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ? या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजपच्या त्या चारही उमेदवारांना आशीर्वाद.
आईंना,ताईंना फोन करून दुःख व्यक्त करताय ठीक आहे पण वाघांनो असं रडताय काय मी आहे ना ,'तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही' बस साहेबांचे आशिर्वाद आहेत दिवसभर फोन उचलले नाही कुणाकुणाला उत्तर देऊ ?या निर्णयाचा मला धक्का अजिबात बसला नाही. भाजप च्या त्या चार ही उमेदवारांना आशिर्वाद!
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 8, 2020
परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पराभवासाठी भाजपमध्येच काही लोक कसे जबाबदार आहेत हे जाहीरपणे सांगितले होते. त्यानंतर झालेल्या शक्ती प्रदर्शनानंतर पंकजा मुंडे यांना भाजप विधानपरिषदेवर आमदार करेल अशी चर्चा होती. भाजपामध्ये आपल्याला डावलले जात आहे असा आरोप करणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यासोबत एकनाथ खडसे यांनीसुद्धा पक्षांमध्ये निष्ठावान नेत्यांना बाजूला सारले जात आहे असा आरोप केला होता.
भाजपकडून नव्या चेहऱ्यांना विधानपरिषदेवर संधी, का कापला भाजपमधील दिग्गजांचा पत्ता?
चंद्रशेखर बावनकुळे, एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांना तर भाजपने विधानसभेच्या वेळी सुद्धा उमेदवारी नाकारली होते. आता पुन्हा डावलले गेल्याने भविष्यात भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढू शकते असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. मात्र या निर्णयाचा मला अजिबात धक्का बसला नाही, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाजपमध्ये असं काही घडणार आहे याची तयारी ठेवली होती का? अशी राजकीय चर्चा रंगू लागली आहेत.
राज्यांमधील भाजप वाढवण्यात गोपीनाथ मुंडे यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याच वारस असताना पंकजा मुंडे यांना मात्र पक्षात राहून संघर्ष करावा लागत आहे, असा सूर सोशल मीडियामध्ये काल (8 मे) दिवसभर पाहायला मिळत होता. आता यापुढे तुमच्यासाठी मी आणि माझ्यासाठी तुम्ही असं म्हणून पंकजा मुंडे यांनी भविष्यातील राजकीय भूमिका अधोरेखित केली आहे.