Dhananjay Munde : आगामी काळात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये या पाच राज्यांच्या निकालाचा परिणाम होणार नाही नसल्याचे मत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिकांच्या निवडणुका या स्थानिक पातळीवर होणार आहेत. त्यामुळं ग्रामीण भागात असलेल्या या निवडणुकांवर या निकालाचा परिणाम होणार नसून, राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं यश मिळेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या बदनामीचे राजकारण थांबवावं असेही मुंडे यावेळी म्हणाले.


माझ्या कामावर आक्षेप असेल तर नाव घेऊन टीका करा


पंकजा मुंडे आणि बीड जिल्ह्यातील इतर भाजपचे लोक हे जिल्ह्याला बदनाम करत आहेत. त्यांनी जिल्ह्याला बदनाम न करता माझ्या कामावर जर त्यांना काही आक्षेप असेल तर माझं नाव घेऊन माझ्यावर टीका करावी. मात्र, आपल्या मायभूमीला बदनाम करु नये. मागासलेला बीड जिल्हा आता कुठेतरी नावारुपाला येत आहे. आम्ही अनेक विकासाची कामे जिल्ह्यामध्ये राबवत आहोत. चांगले अधिकारी जिल्ह्यात आता येत आहेत. त्यामुळं भाजपच्या लोकांनी बीड जिल्ह्याच्या बदनामीचे राजकारण थांबवावं अस देखील यावेळी धनंजय मुंडे म्हणाले. 


बीडमध्ये यापूर्वीदेखील गोळीबारासारख्या घटना घडल्या आहेत. एका कुटुंबाच्या जमिनीच्या वादातून झालेल्या गोळीबारासंदर्भात देखील पोलीस चौकशी करत आहेत. अवैध वाळू उपसा असेल, इतर काही गुन्हेगारी असेल त्या संदर्भात आम्ही प्रशासनासोबत चर्चा करत आहोत. हे थांबवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. विरोधकांनी मात्र कृपा करुन जिल्ह्याची बदनामी करु नये अशी विनंती देखील विरोधकांना मुंडे यांनी केली.


चौकशीतून निश्चित सत्य समोर यावा पण विरोधकांना संपवण्यासाठी ईडी चा वापर होऊ नये असेही मुंडे यावेळी म्हणाले. सध्या राज्यात भाजप आपल्या विरोधकांचा विरोध संपवण्यासाठी ईडी सारख्या संस्थांचा वापर करत आहे. अनेक नेत्यांवर सध्या कारवाई केली जात आहे. ही गोष्ट सर्वसामान्यांना पटत नाही. ईडी आणि इतर संस्थांनी ज्या कारवाया केल्या त्यामध्ये आतापर्यंत किती लोकांना शिक्षा झाली. अनेक नेत्यांच्या चौकशा झाल्या त्याचं पुढं काय झालं? हे देखील जनतेसमोर आलं पाहिजे फक्त विरोधकांना संपवण्यासाठी या संस्थांचा वापर होणं चुकीच असल्याचे मुंडे म्हणाले.


महत्त्वाच्या बातम्या: