IPS Rashmi Shukla : पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.  रश्मी शुक्ला पुण्याच्या पोलीस आयुक्त असताना पुणे पोलिसांना डिजीटल गुन्ह्यात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. या दोन्ही आरोपींनी बीटकॉइन घोटाळ्यातील काही रक्कम स्वत: च्या आणि सहकाऱ्यांच्या खात्यात वळवली होती.


पुणे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे पंकज घोडे आणि रवींद्र पाटील अशी आहेत. या दोघांनी 2018 साली उघडकीस आलेल्या बीटकॉईन घोटाळ्यातील पैसै स्वतःच्या खात्यांवर आणि पुढे त्यांच्या सहकाऱ्यांच्या खात्यावर वळते केल्याचे पुणे सायबर पोलीसांच्या तपासात उघड झालं आहे.  सन, 2018 मधे पुण्यात बीटकॉईनमधे गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने अनेकांची फसवणूक करण्यात आली होती. रश्मी शुक्ला तेव्हा पुण्याच्या पोलीस आयुक्त होत्या. या प्रकरणात पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.  


या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांनी त्यावेळेस 'ग्लोबल ब्लॉकचेन फाउंडेशन'च्या पंकज घोडे आणि के. पी.एम. जी. कंपनीच्या रविंद्र पाटील यांची तांत्रिक मदत घेतली होती. मात्र या दोघांनी या प्रकरणाचा तपास करताना त्यांच्याकडे जमा झालेल्या डेटाचा उपयोग करुन या प्रकरणातील अटक आरोपींच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिप्टो एक्सचेंजच्या वॉलेटमधुन क्रीप्टो करन्सी स्वतःच्या खात्यांवर वळती करून घेतली.  त्यानंतर ही क्रिप्टो करन्सी इतरांच्या खात्यांमधे पाठवण्यात आल्याचे केवायसी वरून स्पष्ट झालं असल्याचं पोलिसांचे म्हणणे आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. या आरोपींना 19 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  या दोघांच्या चौकशीतून त्यांच्या या कृत्यात सहभागी असलेल्या आणि त्यांच्या पाठिशी असलेल्या इतरांची नावे उघड होतील असं पुणे पोलिसांनी म्हटलं. 


बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप; गुन्हा दाखल


रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल आहे. फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत आरोप केले होते. राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त असताना डॉ. रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीर फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. दरम्यान, याबाबत तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीरपणे टेलिफोन टॅपिंग  केल्याप्रकरणी न्यायालयात वाद सुरु असतानाच पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात टेलिग्राफ अॅक्टनुसार गुन्हा दाखल गुन्हा दाखल झाला आहे. फोन टॅपिंग प्रकरणावरुन रश्मी शुक्ला यांच्यावर अनेक राजकीय नेत्यांनी निशाणा साधला होता.  याप्रकरणामुळे राज्यात एकच खळबळ उडाली होती.