Devendra Fadnavis News Updates :  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज पोलिसांकडून त्यांच्याच घरी चौकशी होणार आहे. त्यांना आधी चौकशीसाठी आज सकाळी 11 वाजता वांद्रे कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यात बोलावलं होतं. दरम्यान, देवेंद्र फडणवीस आज बीकेसी पोलीस ठाण्यात जाणार नाहीत तर पोलीस अधिकारीच फडणवीसांच्या बंगल्यावर जाऊन चौकशी करणार आहेत. याबाबत फडणवीसांनी ट्वीट करत माहिती दिली. 


बीकेसी पोलीस ठाण्यातले कर्मचारी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्यावर जात त्यांचा जबाब नोंदवणार आहेत. पोलीस बदली घोटाळा प्रकरणाचा अहवाल लीक झाल्याप्रकरणी फडणवीसांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर फडणवीसांनीही आपण हजर राहणार असल्याचं म्हटलं होतं. पण कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पोलीसच फडणवीसांच्या घरी जात जबाब नोंदवून घेणार आहेत.


फडणवीसांच्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक


दरम्यान फडणवीसांना आलेल्या नोटिशीविरोधात भाजप आक्रमक झाली आहे. आज राज्यभर मुंबई पोलिसांच्या नोटिशीची होळी भाजपतर्फे करण्यात येणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली आहे.


फडणवीसांचं ट्वीट, पोलिसच चौकशीसाठी घरी येणार


त्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक ट्वीट केलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "सहपोलीस आयुक्त, गुन्हे यांचा दूरध्वनी मला आला होता. त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलिस स्टेशनला येण्याची आवश्यकता नाही. आम्हीच घरी येऊन तुमच्याकडून आवश्यक ती माहिती घेऊ. मी माझे उद्याचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द केले असून, दिवसभर घरी उपलब्ध असेन. ते केव्हाही येऊ शकतात. जयहिंद, जय महाराष्ट्र !"






काय आहे फोन टॅपिंग प्रकरण
फोन टॅपिंगप्रकरणी पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर कुलाबा पोलीस ठाण्यात टेलिग्राफ कायद्यांतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, या मागणीसह शुक्ला यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर शुक्रवारी तातडीची सुनावणी पार पडली. यापूर्वी फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांच्यावर पुण्यातील बंड गार्डन पोलीस स्थानकांतही गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याविरोधात शुक्लां यांना नुकताच मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला असून 25 मार्चपर्यंत त्यांच्याविरोधात कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे पुणे पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत. याच प्रकरणात आता फडणवीसांना देखील चौकशीसाठी हजर राहण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.  


संबंधित बातम्या: