(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केवळ मराठी म्हणून मलाही घर नाकारलं, पंकजा मुंडेंनी धक्कादायक अनुभव सांगितला!
सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचं होतं, तेव्हा मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं, अशी धक्कादायक माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मुंबईतील थरारक अनुभव स्वत: सांगितला. केवळ मराठी असल्यामुळे आपल्याला मुंबईत घर नाकारण्यात आलं, असा दावा स्वत: पंकजा मुंडे यांनी केला. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्यामुळे घर नाकारल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. गुजराती नागरिकांनी तृप्ती यांना घर नाकारलं होतं. त्यानंतर पंकजा मुंडे यांनीही आपला अनुभव सांगितला. सरकारी घर सोडून जेव्हा मला घर घ्यायचं होतं, तेव्हा मलाही केवळ मराठी म्हणून घर नाकारलं होतं, अशी धक्कादायक माहिती पंकजा मुंडे यांनी दिली.
पंकजा मुंडे नेमकं काय म्हणाल्या?
नमस्कार, माफ करा थोडी प्रकृती खराब आहे माझी, त्यामुळे बोलायला त्रास होतोय. त्याचबरोबर थोडी मनस्थितीही घराब आहे. सध्याची राजकीय परिस्थिती, समाजातील वातावरण. इतकी सगळी समृद्धी असताना रस्ते आहेत, गाड्या आहेत, लोकांना सगळ्या सुविधा आहेत प्रत्येकाकडे गाड्या आहेत, हायवे आहेत, साधनं आहेत, हे सगळं असताना, कुठेतरी अस्वस्थता वाटते समाजात.
आरक्षणासाठी भांडणं सुरु आहेत, आंदोलनं करतं, मुंडन करतं, हे सगळं बघून हृदयाला पिळ पडतो. त्याचबरोबर माणूस समाजात प्रत्येक रंगांमध्ये वाटला गेलाय. हिरवा आहे, भगवा आहे, पिवळा आहे, निळा आहे. हे सगळं बघून असं वाटतं हे रंग जोरजोरात एकत्र करुन फिरवलं, एका चक्रावर बसून तर त्यातून एक पांढरा रंग येतो. तोशांततेचा रंग आहे हा रंग कधी आपल्या देशाला व्याप्त करेल याची मी प्रतीक्षा करते.
आज एका मराठी मुलीची व्यथा मी पाहिली. खरंतर भाषा आणि प्रांतवादामध्ये मला पडायला आवडत नाही. माझ्या राजकीय पूर्ण प्रवासात मी कधीही जातीवाद, धर्मवाद आणि भाषावाद याच्यावर टिप्पणी केली नाही. कोणी कोणत्या भाषेत बोलावं, कोणी कोणत्या भाषेत त्यांच्या घराचे नावं ठेवावी, दुकानाचे नावं ठेवायचे यामध्ये मी कधी फार उडी घेतली नाही. परंतु एक मुलगी जेव्हा एक रडून सांगत होती की इथे मराठी माणसाला घर देत नाही किंवा मराठी माणूस येथे अलाउड नाही हे म्हणत असताना तिच्यावर प्रकार झाला तो प्रकार मला अस्वस्थ करणार आहे. कारण जेव्हा माझं सरकारी घर सोडून मला घर घ्यायचं होतं, तेव्हा हा अनुभव मलाही बऱ्याच ठिकाणी आला की मराठी माणसांना घर देत नाहीत.
माझं असं म्हणणं आहे, की मी कोणत्या एका भाषेची, एका गोष्टीची बाजू घेत नाही. कारण मुंबईचं सौंदर्य प्रत्येक भाषेने, प्रत्येक जातीने, प्रत्येक धर्माने नटलेले आहे. ही राजकीय नसून, आर्थिक राजधानी आपल्या देशाची आहे. त्यामुळे इथे सर्वांचं स्वागतच आहे. परंतु आम्ही यांना घर देत नाही, असं जर काही बिल्डिंगमध्ये बोलत असतील, तर हे फार दुर्दैव आहे.
माझ्यासारख्या व्यक्तीला सुद्धा याचा अनुभव आला हे फार दुर्दैवी आहे. या देशांमध्ये प्रत्येक राज्यांमध्ये, प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक भाषेच्या प्रत्येक दुसऱ्या राज्याच्या लोकांना, घर देण्यासाठी कोणत्याही जातीच्या लोकांना घर देण्यासाठी परवानगीची आवश्यकता काय? हा माझा प्रश्न आहे. आज गणपती विसर्जनाचा दिवस आहे. आपण गणपतीचे विसर्जन नाही करायचं, गणेशाचा आशीर्वाद घेऊन सगळ्या नकारात्मकतेचे विसर्जन करायचं. सगळ्या आतंकाचं विसर्जन करायचं, सगळ्या वादांचं, जाती, धर्म, प्रांत या सर्वांचं विसर्जन करायचं, असं ठरवू शकत नाही का? बघा कसं वाटतं तुम्हाला. माझी भूमिका परत परत ऐका. कोणी एकासाठी नाही पण ही भूमिका सर्वांनी एक व्हावं यासाठी आहे.