आज विठुरायाचा विवाह सोहळा; पंढरपुरात लगीनघाई, फुलांचा महाल, विठ्ठल-रुक्मिणीला खास पोशाख
Pandharpur Vitthal Rukmini Vivah : परब्रह्म पांडुरंग आणि जगन्माता रुक्मिणीच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात लगीनघाई सुरु आहे.

Pandharpur Vitthal Rukmini Vivah : आज वसंतपंचमी अर्थात वसंताचा म्हणजेच निसर्गाचा उत्सव, निसर्गाचे सौदर्य खऱ्या अर्थाने वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठते . आणि याच मुहूर्तावर परंपरेनुसार होत असतो देवाचा विवाह. वर असतो साक्षात परब्रह्म पांडुरंग आणि वधू असते जगन्माता रुक्मिणी. मग या देवाच्या लगीनघाईचे वेध पंधरा दिवसापासून लागलेले असतात. हा मुहूर्त आज दुपारी बारा वाजता असल्याने विठ्ठल मंदिरात लगीनघाई सुरु आहे. सध्या कोरोनाचे संकट सुरु असल्याने यावर्षी देखील कोरोनाचे नियम पाळून अगदी मोजक्या वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा संपन्न होत आहे.
यावर्षी संपूर्ण विठ्ठल सभा मंडपात फुलांचा महाल करण्याची जोरदार तयारी सुरु झाली आहे. पुणे येथील भाविक भारत भुजबळ हे दरवर्षी देवाच्या लग्नासाठी फुल सजावटीची सेवा देत असतात. गेले पंधरा दिवस 150 पेक्षा जास्त कारागीर या सजावटीची तयारी करण्यासाठी पुणे येथे झटत होती. काल सकाळी अकरा वाजल्यापासून या सजावटीला सुरुवात केली असून 60 कारागिरांनी रात्री 11पर्यंत ही लग्न सोहळ्याची सजावट पूर्ण केली.
लग्नस्थळ असणाऱ्या विठ्ठल सभा मंडपात सात प्रकारच्या फुलांनी महाल साकारला आहे. यामध्ये लाल , पिवळा झेंडू , अष्टर , पांढरी शेवंती , पांढरी डिफ़री अँथोरियमसह इतर पाना फुलांचा वापर केला आहे. याशिवाय लग्न मंडपासमोर फुलांचे द्वारपाल तयार केले आहेत. नामदेव पायरी समोर फुलांची विठ्ठल रुक्मिणी केली असून लग्न सोहळ्यातील मंगल वाद्यांची आकर्षक फुल सजावट आहे.
या लग्न सोहळ्यासाठी 20 प्रकारची देशी विदेशी अशी 6 टन फुले आणण्यात आली असून यात 9 रंगांच्या शेवंती, 6 प्रकारचे गुलाब यांचा वापर विठ्ठल रुक्मिणी गाभारा सजावटीसाठी केला जाणार आहे.
या लग्न सोहळ्यासाठी देवाला पांढऱ्या रंगाची रेशमी अंगी, पांढऱ्या रंगाचे धोतर तर रुक्मिणी मातेला पांढऱ्या रंगाची रेशमी नऊवारी साडी असा पोशाख असणार आहे. रुक्मिणी मातेलाही अतिशय उंची सिल्कची कांजीवरम साडी निवडण्यात आली आहे. तसे दरवर्षी देवाचा पोशाख खास असला तरी यंदा तो फॅशन डिझायनरने बनवून अर्पण केल्याने पहिल्यांदाच देवाला असा खास बनविलेला पोशाख विवाहात घातला जाणार आहे . या शाही विवाहाची कथा भागवताचार्य अनुराधाताई शेटे सांगत असून उद्या कथेच्या विवाहप्रसंगी दुपारी बारा वाजता देवाच्या डोक्यावर अक्षता पडणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
