Pandharpur : मंदिर समितीचा सावळा गोंधळ सुरूच; विठ्ठलभक्तांना प्रसादाचा लाडू मिळत नसल्याने संतप्त, लाखोंचं नुकसान
लाखो भाविकांना विकत मिळत असलेला लाडू प्रसाद फक्त टेंडर उघडायला वेळ नसल्याने मिळत नाही. यामुळे भाविक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
Pandharpur News : लॉकडाऊन काळात पायावर दर्शन बंद असताना रुक्मिणीच्या पायाची झालेली धक्कादायक झीज ABP माझाने समोर आणत मंदिर समितीचा सावळा गोंधळ समोर आणला. आता लाखो भाविकांना विकत मिळत असलेला लाडू प्रसाद फक्त टेंडर उघडायला वेळ नसल्याने मिळत नाही. यामुळे भाविकांचा तीव्र संताप असून आम्ही देवाच्या दर्शनानंतर घरी कोणता प्रसाद न्यायचा असा प्रश्न भाविक विचारात आहेत.
गेल्या काही वर्षांपासून मंदिर समितीने विठ्ठलाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडूची विक्री करण्यास सुरुवात केली होती. वारकऱ्यांमध्ये हा लाडू प्रसाद खूपच लोकप्रिय झाल्याने वर्षभरात साधारण 50 ते 55 लाख लाडूंची विक्री होऊन समितीला यातून लाखो रुपयाचे उत्पन्न मिळत होते. कोरोना काळात हा लाडू प्रसाद समितीने बंद केला मात्र यानंतर राज्यातील सर्व मंदिरे सुरु होताच सर्व मंदिरात प्रसाद विक्री सुरु झाली होती.
मात्र विठ्ठल मंदिरात लाडू प्रसादाचे ई टेंडर डिसेंबर 2020 मध्ये काढण्यात आले होते. याला काही संघटनांनी आक्षेप घेतल्यावर याचा अहवाल विधी व न्याय विभागाकडून मागवण्यात आला. हा अहवाल देखील प्राप्त झाला तरी अजून चार महिने झाले तरी हे टेंडर न उघडल्याने सध्या भाविकांना विकतचा लाडू प्रसाद मिळत नाही.
टेंडर नियमानुसार उघडण्यात अडचण काय असा सवाल आता लाडू ठेक्यात निविदा भरलेले ठेकेदार करत आहेत. मंदिर प्रशासनाकडून मात्र ना टेंडर उघडण्यात येत आहे ना भाविकांना प्रसाद उपलब्ध करून दिला जात आहे. मंदिराचे चांगल्या तुपातील हायजेनिक केअरमध्ये बनविलेले लाडू प्रसाद मिळत नसल्याने आता मंदिर परिसरात जसे मिळतील तसे लाडू प्रासादिक दुकानदारांकडून विकत नेत आहेत.
आम्ही देवाच्या दर्शनाला आल्यावर गावाकडे जाताना प्रसाद म्हणून हा लाडू नेत असतो मात्र सध्या गेले चार महिन्यांपासून लाडू विक्रीला नसल्याच्या तक्रारी भाविक करत आहेत. भाविकांच्या सुखसोयीसाठी मंदिर समितीची स्थापना झाली असताना भाविकांना प्रसाद मिळत नसल्याबाबत समिती मौन बाळगून आहे. ना देवाच्या मूर्तीची चिंता ना भाविकांच्या प्रसादाची चिंता अशी अवस्था सध्या विठ्ठल मंदिराची झाली असून आता सोलापूर जिल्हाधिकारी किंवा राज्य सरकारनं यात लक्ष घालण्याची मागणी भाविक करीत आहेत.