पंढरपूर : आज नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हजारोंच्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनाला आले होते. परंतु, मंदिराच्या व्हीआयपी गेट समोर भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राडेबाजीमुळे भाविकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. 


भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले ( Tushar Bhosle) पत्नी आणि आई समवेत आज पंढरपूरमध्ये (Pandharpur) दर्शनासाठी आले होते. श्री विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर जोरदार टीका केली. दर्शन घेऊन बाहेर पडत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी त्याठिकाणी तुषार भोसले यांच्याकडून शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाब विचारण्यासाठी आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्त व भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये मंदिर परिसरात जोरदार घोषणाबाजी करीत राडा झाला. जवळपास 10 ते 15 मिनिटं हा प्रकार सुरू होता.


याबाबत तुषार भोसले यांनी आपण कोणाचे नाव घेऊन टीका केली नाही, अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली. तर आम्ही अर्धवट माहिती घेऊन बोलणाऱ्या तुषार भोसले यांना शरद पवार यांची माहिती असावी यासाठी त्यांना 'लोक माझा सांगाती' हे पुस्तक भेट देण्यासाठी आलो होतो अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिली. परंतु, तुषार भोसले यांच्या अंगावर काळे टाकण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आल्याचा आरोप भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी केला. 


या घटनेमुळे मंदिर परिसरात काही काळासाठी तणाव निर्माण झाला होता. याचा नाहक मनस्ताप देशभरातून आलेल्या भाविकांना सहन करावा लागला. 


काही दिवसांपूर्वी तुषार भोसले यांनी ट्विटरवरून एक टिपण्णी केली होती. मात्र काही वेळाने ते ट्विट त्यांनी काढून टाकले होते. 


या ट्विटनंतर सोशल मीडियावर तुषार भोसले यांना जाब विचारू अशा प्रतिक्रिया देण्यात आल्या होत्या. त्यानंतर हा प्रकार झाला. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी विठुरायाच्या दारात घडलेल्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या ड्रामेबाजीमुळे सर्वसामान्य भाविक आणि नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. विठ्ठल मंदिर परिसरात कोणतेही आंदोलन करण्यास मनाई असताना राष्ट्रवादी आणि भाजपचे पदाधिकारी मंदिराजवळ जमा होऊ लागल्यानंतर पोलीस प्रशासनाने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना हुसकावून लावीत मंदिर परिसर भाविकांसाठी मोकळा केला. 
महत्वाच्या बातम्या


ABP Majha Impact: सोन्या-चांदीचे दागिने वितळवून नवे अलंकार करण्याचा निर्णय; पंढरपूर मंदिर समितीचा निर्णय


New Year 2022 : नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं; निर्बंध असतानाही राज्यभरातील मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी