पंढरपूर : देशभरातील भाविकांकडून विठुरायाला प्रेमाने आणि भक्तिभावाने अर्पण केलेले लहान-लहान सोन्या-चांदीचे दागिने वितळवून विठ्ठल रुक्मिणीला नवे अलंकार बनविण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. एबापी माझाने या बाबत एक बातमी प्रकाशित केली होती. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तातडीची बैठक घेऊन हा निर्णय घेतला.
मंदिर समितीकडे 1985 सालापासून जवळपास 28 किलो सोन्याचे आणि 996 किलो चांदीचे हजारो लहान-लहान दागिने जमा झाले होते. याची संख्या मोठी असल्याने समितीला हे सोन्या-चांदीचे दागिने पोत्यात भरून ठेवण्याची वेळ आली होती .आज झालेल्या बैठकीत या दागिन्यांचे नवे अलंकार बनविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी माझाशी बोलताना सांगितले.
याबाबत समितीने पुन्हा विधी व न्याय विभागाकडे याबाबत विचारणा करणारे पत्र दिले असून यापूर्वी या सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या विटा बनविण्याचा निर्णय समितीने घेतला होता. मात्र कोरोना काळामुळे शासनाचा प्रतिनिधी न मिळाल्याने हे सोने चांदी वितळविण्याचा निर्णय प्रलंबित ठेवावा लागला होता. तरीही या दोन वर्षात देवाच्या खजिन्यात तब्बल तीन किलो सोने आणि 166 किलो चांदीची भर पडली होती. आता एबीपी माझाच्या बातमीनंतर पुन्हा मंदिर समितीने शासनाकडे या सोने-चांदी वितळविण्याबाबत तातडीने निर्णय देण्यासाठी पत्र दिले आहे.
शासनाने निर्णय दिल्यानंतर हे सोने वितळविण्यासाठी मंदिर समितीचा एक प्रतिनिधी, विधी व न्याय विभागाचा एक प्रतिनिधी आणि रिझर्व्ह बँकेचा एक प्रतिनिधी यांच्या समोर इन कॅमेरा हे सोने चांदी वितळविण्याचा शासनाचा निर्णय असल्याचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी सांगितले. कोविडमुळे शासनाचा प्रतिनिधी येऊ न शकल्याने हे काम थांबले होते. आता मंदिर समितीने पत्रव्यवहार करून लवकरात लवकर त्यांचा प्रतिनिधी पाठवून हे काम सुरु करावे अशी मागणी केली आहे.
विठुरायाच्या खजिन्यात आता 28 किलो सोने आणि 996 किलो चांदी आहे. याला वितळविण्याची प्रक्रिया करायला वेळ लागणार असून यासाठी शासनाने जास्तीत जास्त यंत्रणा दिल्यास हे जोखमीचे काम वेळेत पूर्ण होईल असे गुरव यांनी सांगितले . मात्र या सोन्याच्या विटा करायच्या कि देवासाठी नवे अलंकार याचा अंतिम निर्णय मात्र शासनाकडूनच होणार असून याची अंमलबजावणी करणे मंदिर समितीस बंधनकारक असेल असे गजानन गुरव यांनी सांगितले .
महत्वाच्या बातम्या :
- Kartiki Ekadashi : यंदाची कार्तिकी यात्रा विक्रमी होणार, 6 ते 24 नोव्हेंबरपर्यंत चोवीस तास मुखदर्शन; मंदिर समिती बैठकीत निर्णय
- तब्बल 12 वर्षानंतर कार्तिकीच्या घोडेबाजारात दर्जेदार अश्व दाखल; प्रशासनाच्या निर्णयाकडे व्यापाऱ्यांचे दुर्लक्ष
- पालखी मार्गाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त ठरला, 8 नोव्हेंबरला पंतप्रधानच्या हस्ते होणार शुभारंभ