Maharashtra Corona Omicron Update : कोरोनाचे आकडे पुन्हा वाढत आहेत. याला राज्यातील नेतेमंडळी हातभार लावत आहेत का? असा सवाल उपस्थित होतोय. कारण बड्या विवाहसोहळ्यांना उपस्थिती दर्शवलेल्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत होते. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. आता या नेतेमंडळींना कोरोना झाल्यामुळं त्यांना भेटलेले दुसरे नेते आणि सेल्फीसाठी धडपडत जवळ येणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र धडकी भरली आहे.


त्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेली माहिती अजूनच धक्कादायक आहे. अजित पवार यांनी कोरेगाव भीमामध्ये बोलताना म्हटलं आहे की, चार दिवसांच्या अधिवेशनात राज्यातील 10 मंत्री (ministers), 20 आमदार (mla) कोरोना बाधित (infected coronavirus) झाले आहेत. अजित दादांनी जरी 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोनाबाधित झाल्याचं म्हटलं असलं तरी आतापर्यंत कोरोना झालेल्या नेत्यांची यादी अशी आहे. 


या नेत्यांना कोरोनाची लागण


महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी 
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील


कर्डिलेंच्या मुलाच्या लग्नाला दिग्गजांसह हजारोंची गर्दी अन् विखे पाटलांना कोरोना
अहमदनगरमध्ये भाजपचे नेते शिवाजी कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या लग्नात भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, आमदार गिरीश महाजन, भाजप नेते राम शिंदे अशा दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. त्यात कोरोना झालेले आमदार राधाकृष्ण विखे पाटील अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असल्याचे पाहायला मिळाले होते. 


खासदार सुप्रिया सुळे, त्यांचे पती सदानंद सुळे यांनाही कोरोना झाल्याचं समोर आलंय. सुप्रिया सुळे यांनी कोरोना झाल्याचं ज्या दिवशी सांगितलं त्याच दिवशी हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती, असं त्यांच्या ट्वीटवरुन दिसून येतंय. हर्षवर्धन पाटील यांच्या मुलीचं लग्न पार पडलं होतं. या लग्नाला देखील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना देखील कोरोनाची लागण झाल्याचं नुकतचं निष्पन्न झालं आहे. विशेष म्हणजे वर्षा गायकवाड अधिवेशनात उपस्थित होत्या.  


राष्ट्रीय स्तरावरही वेगळं चित्र नाही
लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांनीच जर नियम तोडले तर बाकीच्यांना काय बोलणार असा सवाल देखील उपस्थित होतोय. बरं ही नेतेमंडळी सार्वजनिक कार्यक्रमांनी उपस्थिती दर्शवतात. यातले अनेक जण विनामास्क दिसून येतात. राष्ट्रीय स्तरावरही वेगळं चित्र नाही. देशाचे पंतप्रधान मोदींसह अनेक मंत्री आणि महत्वाचे नेते मोठ्या गर्दीच्या रॅलींमध्ये सहभागी होतात. विशेष म्हणजे अनेकदा पंतप्रधानांसह अनेक नेत्यांच्या तोंडावर मास्कदेखील नसतो.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha