School Anniversary Celebration : आपण मुलांचे, प्राण्यांचे,वास्तूंचे व विविध उपक्रमातुन अनेकदा विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केल्याचे आपल्या ऐकिवात असेल, पण नव्याने अर्धापूर तालुक्यात समाविष्ट झालेल्या देशमुखवाडी या गावात गावकरी शिक्षक व विद्यार्थींनी मिळून, चक्क शाळेचा वाढदिवस साजरा केलाय". अर्धापूर तालुक्यातील चोरंबा (नां) गावाच्या ग्रामपंचायत अंतर्गत येणारे डोंगरात वसलेले संपूर्ण आदिवासी वस्ती असलेले गाव देशमुखवाडी या गावात चौथीपर्यंत शाळा आहे. शाळेची स्थापना 31 डिसेंबर 1989ची, आपल्या शाळेचा वाढदिवस साजरा करण्याची कल्पना जेव्हा येथील मुख्याध्यापक सुनिल धोबे यांनी मांडली, तेंव्हा गावकऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. दि.31डिसेंबर शुक्रवारी रोजी या वर्षाच्या शेवटच्या दिवशी हा दिवस आनंदाने साजरा करण्यात आलाय .
शाळा वाढदिवसाच्या निमित्ताने वर्ग सजावट करण्यात आली . संपुर्ण शाळेला फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आले. रांगोळ्या काढून फुलांची सजावट करुन परिसर आनंददायी करण्यात आला . गावकऱ्यांनी यात मोलाची साथ दिली . याप्रसंगी शेजारच्या सायलवाडी, मोठा तांडा येथील ही विद्यार्थी सहभागी झाले. कविता, गीत गायनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी निमगाव केंद्राचे केंद्रप्रमुख ग.ई. कांबळे उपस्थित होते तर गावकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व या नवीन उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी प्रा.शा. चाभरा शाळेचे पदोन्नत मुख्याध्यापक चंद्रकांत दामेकर होते .
या प्रसंगी बोलताना दामेकर म्हणाले की चांगल्या उपक्रमात गावकऱ्यांनी हिरीरीने भाग घेतला पाहिजे व चांगल्या कामात एकजूट दाखवून दिली पाहिजे . मुलांना मोठी स्वप्ने दाखवा . बुद्धीमत्ता ग्रामीण भागातील मुलांतही भरपूर आहे त्याला योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता आहे . शिक्षण हीच सध्याच्या काळातील खरी गुंतवणुक आहे. केंद्रप्रमुख ग.ई. कांबळे आपल्या भाषणात म्हणाले की गावकऱ्यांच्या मदतीने शाळा उत्तम व्हावी व शाळा उत्तम झाली म्हणजे पर्यायाने गाव उत्तम होते .
कार्यक्रमास या परिसरातील इतर जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक ही उपस्थित होते. त्याच प्रमाणे या कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थ्यांत आनंदाचे वातावरण होते व आपल्या शाळेबद्लची त्यांची आपुलकी वाढवणारा हा कार्यक्रम ठरलाय. या कार्यक्रमास शिक्षक, विद्यार्थी व गावातील महिला, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थिती होते .