Pandharpur: काय म्हणता? मुंगूसाला चहाची तलफ! पंढरपुरात 'चहाबाज' मुंगूसाची जोरदार चर्चा
चहाची सवय आता प्राण्यांनाही जादू लागलीय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. असा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे पंढरपुरातील हे एक मुंगूस. काय आहे ही स्टोरी वाचा...
Pandharpur News : दूध पिण्याची (Milk) आवड असलेल्या भारताला चहा (Tea) पिण्याची सवय ब्रिटिशांनी लावली आणि ती आज भारतीयांची महत्वाची गरज बनून गेली आहे. सकाळी वाफाळत्या चहाचा कप हातात आल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. त्यामुळेच आज चहाचे विविध ब्रँड खेडोपाडी देखील पावलापावलावर दिसतात. पण चहाची सवय आता प्राण्यांनाही जादू लागलीय काय? असा सवाल आता उपस्थित होतोय. असा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे पंढरपुरातील हे एक मुंगूस. पंढरपुरातील एका चहाच्या टपरीवर काही दिवसांपासून रोज एक मुंगूस दिवसातून दोन ते तीन वेळा येते आणि चहा पिऊन जाते. या मुंगूसाची चर्चा सध्या पंढरपुरात जोरदार सुरु आहे.
पंढरपूर पुणे रोडवरील इसबावी भागात सचिन देशमाने एक चहाचा गाडा चालवतात. त्यांच्या चहाला खास चव असल्याने अनेक चहाबाज मंडळी येथे चहा घेण्यासाठी येत असतात. याच सचिन यांच्या गाड्याच्या मागे इमारतीचे काम सुरु असून काही महिन्यांपासून एक मुंगूस येथे येत असल्याचं सचिन यांनी सांगितलं. पहिल्यांदा हे मुंगूस इथं आल्यानंतर सचिन यांनी त्याच्यासाठी एका डिशमध्ये चहा ठेवला, तर या मुंगुसाने हा चहा फस्त केला.
इथूनच त्याला चहाची सवय जडली आणि दिवसातून दोन तीन वेळा हे मुंगूस त्याला चहाची तलफ झाली की चहाच्या गाड्यावर येते आणि पत्र्याला धडक मारते. यानंतर त्याचा इशारा समजून सचिन या मुंगूसाला एका डिशमध्ये चहा ओतून ठेवतो. यानंतर हे मुंगूस पत्र्याच्या खालून बाहेर येते आणि चहा पिऊन टाकते.
मुद्दामून जर सचिन याने चहाची डिश थोडी अलीकडे लोकात ठेवली तर हे मुंगूस हळू हळू पायाने डिश मागे ओढत नेते आणि मग निवांत चहा पिऊन निघून जाते. सचिनच्या गाड्यावर रोज येणारे ग्राहक ज्या पद्धतीने न चुकता चहा प्यायला येतात तसेच हे चहाबाज मुंगूस देखील दिवसातून दोन तीन वेळा येथे येऊन चहा पिऊन जाते. आता या चहाबाज मुंगूसाची चर्चा शहरात पसरल्याने उत्सुकतेने अनेक मंडळी या चहाबाज मुंगूसाच्या येण्याची वाट पाहत बसलेले असतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Herbal Tea : वजन कमी करण्यासाठी हर्बल टी उपयुक्त; आठवड्यातच दिसून येईल सकारात्मक बदल
World Tea Day 2022 : चहाची टपरी ते टी आऊटलेट...१४ लाख रुपये किलो दराने विकली जाते चहा पत्ती ?