पंढरपूर : पंढरपूर पोटनिवडणुकीत भाजपात गेलेले कल्याणराव काळे परत राष्ट्रवादीच्या वाटेल लागल्याने हादरलेल्या भाजपकडून त्यांना थांबवण्याचे प्रयत्न सुरु झाले आणि यातूनच चेक मेटचे राजकारण समोर येऊ लागले आहे. कल्याण काळे यांची समजूत घालण्यासाठी काल (सोमवारी) दुपारी माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी थेट कल्याण काळे यांचे पंढरपुरातील कार्यालय गाठले. येथे कल्याणराव आणि त्यांची बैठक सुरु झाली आणि याची खबर राष्ट्रवादीच्या गोटात समजल्यावर आमदार संजय शिंदे यांनीही लगेच कल्याण काळे यांचे कार्यालय गाठले. आमदार संजय मामा पोहोचल्याने खासदार महोदय गडबडून गेले आणि त्यांचा डाव फसल्याचे लक्षात येताच संजय मामा यांच्या समोरच चर्चा करायची पाळी खासदार निंबाळकर यांचेवर आली. 


गेल्या लोकसभा निवडणुकीत खासदार रणजित निंबाळकर आणि संजय शिंदे यांच्यातच लढत झाली होती आणि यात संजय शिंदे यांचा मोठा पराभव झाला होता. वास्तविक संजय मामा आणि रणजित शिंदे हे दोघेही जुने मित्र मात्र लोकसभा निवडणुकीत एकमेकांसमोर उभे राहिल्यानं दोघांच्याही मनात कटुता आहेच. सध्या रणजित निंबाळकर हे भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्यासाठी प्रयत्न करीत असून संजय मामा यांच्यावर राष्ट्रवादी उमेदवार भगीरथ भालके यांची जबाबदारी आहे. ही निवडणूक सध्या अतिशय अटीतटीची सुरु असल्याने प्रत्येकजण आपले नेते आणि कार्यकर्ते जपण्याचा प्रयत्न करीत आहे. यातच भाजपमधील कल्याणराव काळे यांना अजित पवार यांनी गळाला लावल्याने भाजप गोटात मोठी खळबळ उडाली आहे. कल्याणराव काळे हे सहकार महर्षी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून अनेक संस्थांवर त्यांचे वर्चस्व असल्याने कार्यकर्त्यांची मोठी फौज त्यांच्याकडे आहे. खासदार निंबाळकर यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयात कल्याण काळे यांचाही हातभार असल्याने निंबाळकर यांना कल्याणराव राष्ट्रवादीत जाणे परवडणारे नाही. यामुळेच आज त्यांनी कल्याणराव काळे यांची भेट घेतली. मात्र आमदार संजय मामा यांनी ऐनवेळी तेथे पोचून भाजपाला चेकमेट दिली. असे असले तरी या गुप्त बैठकीची सवंग चर्चा मात्र दिवसभर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यात सुरु होती. 


पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा


लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतलेले कल्याणराव काळे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधायचा निर्णय घेतल्याने पंढरपूर पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा हादरा बसणार आहे. कल्याणराव काळे हे पूर्वीपासून विठ्ठल परिवार आणि  भारत भालके यांच्या सोबत होते. या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भारत भालके यांच्या निधनानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असून आपली सर्व ताकद भगीरथ भालके यांच्या मागे उभी करणार आहेत. आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे काळे यांच्या फार्म हाऊसवर स्नेह भोजनासाठी जाणार असून कल्याणराव काळे यांनी त्यांना निमंत्रित केले आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :