सोलापूर : पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपाला थोडी खुशी थोडा गमचा अनुभव आला असून राष्ट्रवादीच्या वाटेत मात्र मित्रपक्षाने काटे टाकले आहेत. आज पंढरपूर पोटनिवडणुकीत 30 उमेदवारांपैकी 11 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणूक रिंगणात 19 उमेदवार उरले आहेत. 


आज भाजपला थोडे दिलासादायक चित्र तयार होताना बंडखोरी केलेले पंढरपूरच्या नगराध्यक्षांच्या पती नागेश भोसले, धनगर समाजाचे जहाल नेते अशी ओळख असलेले माऊली हळणवर, मंगळवेढ्याचे संजय चारानु पाटील अशा अनेक दिग्गजांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. मात्र, भाजप उमेदवार समाधान अवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर अवताडे यांनी आपला अर्ज कायम ठेवत भाऊबंधकीची डोकेदुखी मागे लावली आहे. भावाचीच समजूत घालता न आल्याने समाधान अवताडे यांच्या अडचणी वाढणार आहेत. 


Pandharpur By-election | पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा, कल्याणराव काळे पुन्हा बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ
    
राष्ट्रवादीच्या विरोधात पहिल्यापासून आक्रमकपणे निवडणुकीत उतरलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आपली उमेदवारी कायम ठेवत राष्ट्रवादीच्या वाटेत काटे पसरले आहेत. यातच शिवसेनेतून निलंबित झालेल्या शैला गोडसे यांनीही आपली उमेदवारी कायम ठेवत राष्ट्रवादीच्या अडचणी वाढवल्या आहेत. आता पंढरपूर पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे भगीरथ भालके आणि भाजपच्या समाधान अवताडे यांच्यात प्रमुख लढत असली तरी बंडखोर किती मते घेतात यावर निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे.


पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा
लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचे कमळ हातात घेतलेले कल्याणराव काळे यांनी पुन्हा राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधायचा निर्णय घेतल्याने पंढरपूर पोटनिवडणुकीपूर्वीच भाजपाला मोठा हादरा बसणार आहे.


कल्याणराव काळे हे पूर्वीपासून विठ्ठल परिवार आणि  भारत भालके यांच्या सोबत होते. या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आता भारत भालके यांच्या निधनानंतर ते पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असून आपली सर्व ताकद भगीरथ भालके यांच्या मागे उभी करणार आहेत. आज राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे काळे यांच्या फार्म हाऊसवर स्नेह भोजनासाठी जाणार असून कल्याणराव काळे यांनी त्यांना निमंत्रित केले आहे.